पुणे : बुधवारी राज्यात ८५ रुग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. यापैकी ४७ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ( एनआयव्ही) तर ३८ भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) रिपोर्ट केले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ११ रुग्णांचा समावेश आहे. यापैकी ६ रुग्ण समुदाय सर्वेक्षणातून आढळले असून प्राथमिक माहितीवरुन त्यांचा कोणाचाही आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास नाही. त्यामुळे ओमायक्रॉन व्हेरियंटचा सामुदायिक संसर्ग सुरू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एनआयव्हीच्या अहवालातील ४७ रुग्णांमध्ये ४३ आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि ४ निकटसहवासित आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवडमधील ३, पुणे शहरातील २ रुग्णांचा समावेश आहे. आयसर संस्थेने रिपोर्ट केलेले ३८ रुग्ण समुदाय सर्वेक्षणातून आढळले असून प्राथमिक माहितीवरुन त्यांचा कोणाचाही आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास नाही. यामध्ये पिंपरी चिंचवडमधील ३, पुणे शहरातील २ आणि पुणे ग्रामीणमधील १ रुग्णाचा समावेश आहे.
आजपर्यंत राज्यात एकूण २५२ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण
आजपर्यंत राज्यात एकूण २५२ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवडमधील २५, पुणे ग्रामीणमधील १८ आणि पुणे शहरातील ११ रुग्णांचा समावेश आहे. यापैकी ९९ रुग्णांना आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ८७९ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १७६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.