पुणे जिल्हा बँक पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात
By admin | Published: May 7, 2015 03:06 AM2015-05-07T03:06:40+5:302015-05-07T05:44:35+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँगे्रसने निर्विवाद वर्चस्व मिळविले.
पुणे : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँगे्रसने निर्विवाद वर्चस्व मिळविले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली २१ पैकी १९ जागांवर त्यांच्या समर्थकांनी विजय मिळविला.
अजित पवार यांच्या तडजोडीच्या राजकारणामुळे बँकेच्या निवडणुकीत मतदानापूर्वीच विरोधकांची हवा गेली. साखर कारखान्यांच्या निवडणुकीत सहकार्य करण्याच्या अटीवर पवारांचे कट्टर विरोधक समजले जाणारे चंदूकाका जगताप, संग्राम थोपटे, राहूल कुल, हर्षवर्धन पाटील यांनी बँकेच्या निवडणुकीत तडजोडी केल्या. त्यामुळे सहा जागा बिनविरोध झाल्या. त्यात दोन काँग्रसचे संचालक आहेत.
राष्ट्रवादी काँगे्रसने सर्वपक्षीय मोट बांधत ‘सहकार पॅनल’च्या माध्यमातून १० उमेदवार निवडून आणले. तर खेड, जुन्नर, मुळशी आणि शिरुर तालुक्यात राष्ट्रवादी काँगे्रस समर्थक उमेदवार निवडून आले. मावळ तालुक्यात मात्र राष्ट्रवादीचेच बंडखोर बाळासाहेब नेवाळे यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर दाभाडे यांचा पराभव केला. खेड तालुक्यात माजी आमदार दिलीप मोहिते भाजपाच्या पाठिंब्यावर प्रथमच जिल्हा बँकेवर निवडून आले.
भाजपातर्फे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली शेवटच्या टप्प्यात भाजपाने ‘परिवर्तन पॅनल’च्या माध्यमातून सहा उमेदवार उभे केले. मात्र ‘परिवर्तन पॅनल’ भूईसपाट झाले.