पुणे फेस्टिव्हलचे हेमा मालिनी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 08:08 PM2018-09-10T20:08:48+5:302018-09-10T20:14:47+5:30
पुणे फेस्टिव्हल यंदा ३० वे वर्ष साजरे करीत असून १३ ते २३ सप्टेंबर दरम्यान साजरा होणार आहे.
पुणे : कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, क्रीडा यांचा मनोहरी संगम असलेल्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवारी ज्येष्ठ अभिनेत्री खासदार हेमामालिनी यांच्या हस्ते होणार आहे. यंदा बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंत गायकवाड आणि अभिनेते विक्रम गोखले यांना 'पुणे फेस्टिव्हल अॅवॉर्ड' या सन्मानाने गौरवले जाणार आहे, अशी माहिती फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे फेस्टिव्हल यंदा ३० वे वर्ष साजरे करीत असून १३ ते २३ सप्टेंबर दरम्यान साजरा होणार आहे. पालकमंत्री गिरीष बापट व राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ प्रमुख पाहुणे आहे. शताब्दी साजरी करणा-या साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर (गणेशोत्सव मंडळ) यांचा यंदा गौरव केला जाणार आहे. जेष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन, प्रख्यात कथ्थक नृत्यांगना ऋजुता सोमण व भरतनाट्य नृत्यांगना अरुंधती पटवर्धन गणेशवंदना सादर करतील. ज्येष्ठ कवी ग.दि. माडगूळकर, ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके आणि साहित्यिक, अभिनेते पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गाण्यांचे प्रातिनिधिक सादरीकरण करणारा स्वरांजली हा कार्यक्रम भाग्यश्री अभ्यंकर, सोनाली नांदुरकर, ऋषिकेश बडवे आणि हेमंत वाळूंजकर सादर करतील. याबरोबरच गोल्डन इरा आॅफ म्युझिक, जेष्ठ संगीतकार सी.रामचंद्र, सुधीर फडके, नौशाद अली, स्नेहल भाटकर, राम कदम व गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त भव्य वाद्यवृंदासह हिंदी मराठी गाण्यांचा 'सुहानासफर', अ.भा. हिंदी हास्य कवी संमेलन, आदी कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाचे समन्वयक कृष्णकांत कुदळे, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सुभाष सणस उपस्थित होते.