एचआयव्हीच्या विळख्यातून मुक्त होतेय पुणे
By admin | Published: December 31, 2014 11:13 PM2014-12-31T23:13:52+5:302014-12-31T23:13:52+5:30
दशकापूर्वीपर्यंत ज्या आजाराने जगभरात भीती पसरवली होती त्या एचआयव्हीच्या विळख्यातून पुणे मुक्त होत असल्याचे आशादायी चित्र दिसून येत आहे.
राहुल कलाल - पुणे
दशकापूर्वीपर्यंत ज्या आजाराने जगभरात भीती पसरवली होती त्या एचआयव्हीच्या विळख्यातून पुणे मुक्त होत असल्याचे आशादायी चित्र दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांत पुण्यातील एड्सग्रस्तांची संख्या घटत असल्याचे दिसून आले आहे.
विविध क्षेत्रांत वेगाने घोडदौड करणाऱ्या पुण्यात एचआयव्हीचा संसर्ग होण्याचे प्रमाणही खूप होते. २०१३ मध्ये २ हजार २७१ जणांना एचआयव्हीचा संसर्ग झाला होता. हे प्रमाण कमी करण्यासाठी समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या. त्यामुळे २०१४ या वर्षात हे प्रमाण झपाट्याने घटून १ हजार ५५८ रुग्णांपर्यंत खाली आहे.
एकदा झाला की कधीही बरा न होणारा आजार अशा या भयानक आजाराबाबत मोठया प्रमाणात जनजागृती झाल्याने ही संख्या घटत असल्याचे चित्र आहे. हे सकारात्मक चित्र तयार करण्यामध्ये सरकारी स्तरावरील योजनांसह स्वयंसेवी संस्थांचा मोठा सहभाग आहे.
सन २०१३ मध्ये महिन्याकाठी साधारणत: अडीचशे ते तीनशे रुग्ण शहरात सापडत होते. मात्र, २०१४ मध्ये हे प्रमाण घटून दोनशेच्या घरांमध्ये आले.
चांगल्या उपचारामुळे वयोमानही वाढले
एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीची प्रतिकारक्षमता वेगाने घटून अवघ्या काही वर्षात संबंधित व्यक्तीचा मृत्यू होत होता. एचआयव्ही पूर्णपणे बरा होणारे औषध अजूनही विकसित करण्यात न आल्याने एचआयव्हीने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण दशकापूर्वी खूप मोठे होते. मात्र विविध संशोधनांमधून एचआयव्हीचे विषाणू रोखणारे आणि प्रतिकारक्षमता
वाढविण्यास मदत करणाऱ्या औषधांचा
वापर उपचारामध्ये वाढला. या औषधांमुळे एचआयव्हीची लागण झालेल्या रुग्णांचे वयोमान वाढले आहे.