पुण्यात मित्रानेच केला सेवानिवृत्त शिक्षकावर अॅसिडहल्ला, रुग्णालयात उपचार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 11:01 PM2018-01-22T23:01:23+5:302018-01-22T23:14:26+5:30
मित्रानेच सेवानिवृत्त शिक्षकाच्या अंगावर अॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सासरबागेसमोरील रोडवर सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या शिक्षकास खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुणे : मित्रानेच सेवानिवृत्त शिक्षकाच्या अंगावर अॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सासरबागेसमोरील रोडवर सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या शिक्षकास खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भारत खंडु साबळे (वय ६०, रा.सनसिटी, सिंहगड रोड )असे जखमी झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. स्वारगेट पोलिसांनी मनोज चव्हाण (वय ४५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत साबळे हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. ते रेंजहिल्स येथील एका शाळेतून सहा महिन्यापूर्वी निवृत्त झाले़ मनोज चव्हाण व साबळे हे गेल्या १८ ते २० वर्षांपासून मित्र असून त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. मनोज चव्हाण हा पुणे महापालिकेच्या टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयात लिपिक या पदावर नोकरीला आहे. साबळे हे सोमवारी दुपारी सारसबागेजवळील अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोरील फुटपाथवरुन पायी जात होते. त्यावेळी मनोज चव्हाण तेथे आला. बोलता बोलता त्याने साबळे यांच्या अंगावर बाटलीतून आणलेले अॅसिड फेकले. त्यात साबळे यांचा चेहरा, मान व गळ्यावर अॅसिड पडल्याने ते भाजले. त्यानंतर चव्हाण तेथून पळून गेला.
साबळे यांनी ही माहिती आपल्या मुलाला फोन करुन सांगितली. नागरिकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी पाचच्या दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळाली़ पोलिसांनी रुग्णालयात जाऊन याची माहिती घेतली. चव्हाण याने साबळे यांच्यावर का हल्ला केला त्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. स्वारगेट पोलीस अधिक तपास करीत आहेत.