पुणे : पालकमंत्र्यांसह अन्य राजकीय पदाधिकाºयांना विचारात न घेता महामेट्रो कंपनी पुण्यातील मेट्रोचे काम करत असल्याने या कामाबाबत राजकीय पदाधिकाºयांमध्ये नाराजी दिसत आहे. त्यामुळेच वर्षपूर्तीनिमित्त कंपनीने आयोजित केलेल्या सर्वच उपक्रमांकडे पुढाºयांनी पाठ फिरवली असल्याचे दिसते आहे.बहुचर्चित पुणे मेट्रोची घोषणा झाली त्याला वर्ष झाले आहे. त्यानिमित्त महामेट्रो कंपनीच्या वतीने गेले काही दिवस पुणे, पिंपरी-चिंचवड येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील एक कार्यक्रम मंगळवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी साडेपाच वाजता होता. आधी त्याचे स्थळ शनिवारवाडा पटांगण निश्चित करण्यात आले होते. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक तसेच अन्य काही राजकीय पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, महामेट्रो कंपनीचे वरिष्ठ अधिकारीही त्यात सहभागी होणार असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते.मात्र, नंतर अचानक या कार्यक्रमाचे स्थळ बदलण्यात आले. पालकमंत्र्यांनीच त्याबद्दल नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती मिळाली. गेल्या काही महिन्यांत शनिवारवाड्याच्या अनुषंगाने घडलेल्या घटना लक्षात घेता हे स्थळ का ठेवले, अशी स्पष्ट विचारणा पालकमंत्र्यांनी महामेट्रोकडे केली असल्याचे समजते. त्यानंतर घाईघाईत स्थळ बदलून बालगंधर्व रंगमंदिर निश्चित करण्यात आले. मात्र, पालकमंत्र्यांसह महापौर व अन्य पदाधिकारीही या कार्यक्रमाला आलेच नाहीत. फक्त प्रशासकीय अधिकारी व महामेट्रोचे अधिकारी अशीच ही चर्चा झाली.राजकीय पदाधिकाºयांचा सहभाग नाहीगेला आठवडाभर महामेट्रोने घेतलेल्या वर्षपूर्ती उपक्रमातही कोणी राजकीय व्यक्ती सहभागी झाली नाही. कंपनीचे काम प्रशासनाचेच वर्चस्व आहे असे दाखवत चालले असल्याची बहुसंख्य राजकीय पदाधिकाºयांची भावना झाली आहे. त्यातही पुणे शहरात आठही आमदार भाजपाचेच आहेत. खासदारही भाजपाचेच आहेत.महापालिकेतही भाजपचीच पूर्ण बहुमताने सत्ता आहे. असे असताना भाजपाच्या पदाधिकाºयांना जाहीर कार्यक्रमांपासून लांब ठेवले जात असल्याबद्दल नाराजी आहे. किमान लोकप्रतिनिधींना तरी सन्मानाने निमंत्रित करायलाहवे, अशी राजकीय व्यक्तींची भावना आहे.पालकमंत्री बापट यांनी महामेट्रोच्या अधिकाºयांना यापूर्वी तशा सूचनाही दिल्या असल्याची माहिती मिळाली, मात्र, त्याची अंमलबजावणी महामेट्रो कंपनीकडून झाली नाही. वर्षपूर्तीचा कार्यक्रमही प्रशासनाने आपल्यापुरताच मर्यादित ठेवला. त्यामुळे नाराजीत वाढच झालेली दिसत आहे.
पुणे : पालकमंत्र्यांची मेट्रोकडे पाठ, आमदार, खासदारही नाराज : प्रशासनाचाच कारभार सुरू असल्याची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 6:27 AM