पुणे : शाळेतील स्वच्छतागृहात जाऊन मुलीवर बळजबरी, शाळेच्या आवारात जाऊन मुलीवर चाकूने वार, क्रीडापटू मुलीचा खून अशा एकामागोमाग एक घटना पुण्यातील शाळांमध्ये घडत आहेत. अजूनही हे चित्र बदललेले नाही. शिक्षणासाठी जगभरात हॉटलिस्टेड असलेले पुणे गेल्या सहा महिन्यांत सुरक्षेबाबत मात्र हिटलिस्टवर आले आहे.
खडकीतील एका नामांकित शाळेमध्ये चार वर्षांच्या मुलीचा अपहरणाचा प्रयत्न झाला. शाळेमध्येच हा प्रकार घडल्याचे समोर आल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दिवसातील निम्मे तास मुले शाळेतच असतात, त्यामुळे त्यांची सुरक्षितता ही शाळा प्रशासनाची मोठी जबाबादारी आहे. मात्र, तिथेच शाळा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे या घटनांमधून समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर पालकांसह शालेय प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
२५ हजारांपासून दीड लाखांपर्यंत शैक्षणिक शुल्क आणि वार्षिक दहा हजारांपासून पंधरा हजारांपर्यंत बस प्रवासाचा खर्च पालकांकडून घेणाऱ्या शाळांमध्ये मुले सुरक्षित नाहीत. हेच गेल्या सहा महिन्यांत वारंवार सिद्ध होत आहे. पोलीस दीदी, पोलीस काका शाळांमध्ये कार्यान्वित करण्यात आले आहेत. शाळाही म्हणते, आम्ही सीसीटीव्ही बसवले, सुरक्षा रक्षक नेमले आहेत, तरीदेखील अशा घटना घडतातच कशा, यामध्ये दोष कोणाचा, असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे.
काय आहेत पालकांच्या प्रतिक्रिया-
मुलाचे आई-बाबा शाळेत मुलांना न्यायला आल्याशिवाय मुले कोणाच्याही ताब्यात देऊच नयेत. आई-बाबांना शाळेत न्यायला येणे जमणार नसेल आणि त्यांच्याऐवजी दुसरे कोणी मुलांना न्यायला आल्यास मुलांच्या आई-बाबांना व्हिडिओ कॉल करावा व त्यांना न्यायला आलेली व्यक्ती दाखवूनच आई-बाबांच्या परवानगीने मुले त्यांच्या ताब्यात द्यावीत.
-अजिनाथ पवार, गोळवलकर शाळेचे पालक
मुलांना शाळेत नेण्यासाठी आलेली व्यक्तीला मुले ओळखत असतील तर आणि तरच मुलांना त्यांच्या स्वाधीन करावे. शिवाय त्यांच्याकडे स्वाधीन करताना संबंधित व्यक्तीचे अधिकृत ओळखपत्र, मोबाईल नंबर आणि पालकांची परवानगी देणारा कॉल शिक्षकांना येणे आवश्यक आहे.
- प्राची जाधव, पालक
विद्यार्थ्यांना एक व्हिजिट कोड देण्यात यावा, तो नंबर सांगणाऱ्यालाच विद्यार्थ्यांना भेटायची परवानगी असावी. तो नंबर शाळेने फक्त आई-वडिलांनाच द्यावा. त्यापुढे जाऊन अनोळखी व्यक्ती मुलांना न्यायला आल्यास त्याची ओळख आणि उलटतपासणी होणे अत्यंत मह्त्वाचे आहे.
-योगेश सर्जेराव , वारजे
प्रत्येक वर्गशिक्षकाकडे त्यांच्या वर्गातील मुलांच्या पालकांचा व्हाॅट्सॲप ग्रुप असतो. त्यावर शाळेत आलेल्या मुलांची यादी टाकावी व पालकांनीही मुलांना नेण्यास येणार की अन्यत्र कोणाला पाठविणार याची माहिती द्यावी. ती व्यक्ती न्यायला आल्यावर पालकांना फोन करून खातरजमा केल्यावरच मुलाला त्यांच्या ताब्यात द्यावे.
- सुदाम विश्वे, सिंहगड रोड