ई- फेरफारमध्ये पुण्याची दहा क्रमाकांनी झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:01 AM2021-02-05T05:01:00+5:302021-02-05T05:01:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यात ई-फेरफार प्रकल्पाची जोरदार अंमलबजावणी सुरू आहे. यामुळेच गेल्या पाच महिन्यांत राज्यात पुणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यात ई-फेरफार प्रकल्पाची जोरदार अंमलबजावणी सुरू आहे. यामुळेच गेल्या पाच महिन्यांत राज्यात पुणे जिल्ह्याचा क्रमांक २१ वरून थेट ११ वर आला आहे. राज्यात अन्य जिल्ह्याच्या तुलनेत कामाचा व्याप अधिक असताना जिल्ह्यातील तलाठी, सर्कल अधिकारी आणि तहसीलदार यांनी केलेल्या चांगल्या कामामुळेच राज्यात पुणे जिल्ह्याचे रॅकिंग वाढत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिली.
सध्या संपूर्ण राज्यात ई- फेरफार प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असून, शासनाच्या स्तरावर नियमित आढावा घेतला जातो. याबाबत देशमुख यांनी सांगितले की, कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे गेले काही महिने महसुली कामांना ब्रेक लागला होता. परंतु आता कोरोना सोबतच गावपातळीपासून जिल्हास्तरावर सर्व अधिकाऱ्यांना महसुली कामांना प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे. यात ई- फेरफार प्रकरणे मार्गी लावण्यासाठी विविध कॅम्प घेणे, दर आठवड्याला आढाव बैठक घेण्यात येत आहे. यामुळेच आजअखेर जिल्ह्यात तब्बल ७ लाख ८७ हजार ३०४ नोंदी ऑनलाईन आल्या आहेत. अद्याप २५ हजार ९५९ नोंदी प्रलंबित असून येत्या काही महिन्यांत जास्तीत जास्त काम करून पहिल्या पाचमध्ये येण्याचा प्रयत्न असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
सध्या राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमातील या कार्यक्रमांतर्गत संगणकीकृत सातबाराच्या डेटाचे अद्ययावतीकरण करणे, युनिकोडमध्ये रुपांतर करणे, तालुकास्तरावरील महसूल कार्यालयांची समांतर जोडणी करणे व दुय्यम निबंधक कार्यालयांची महसूल कार्यालयांशी जोडणी करणे आदी अनेक गोष्टी एकाच वेळी सुरू आहेत. याचच एक भाग म्हणजे ई-फेरफार नोंदीचे काम असल्याचे देशमुख यांनी सांगितले.