Pune Lockdown : पुणे शहरात ५ दिवसांत २३ हजारांहून अधिक जणांवर कारवाई; विनाकारण घराबाहेर पडलेल्यांची नाही खैर..
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 11:15 PM2021-05-11T23:15:03+5:302021-05-11T23:15:58+5:30
नागरिकांना अत्यावश्यक किराणा, दुध, भाजीपाला खरेदीसाठी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे...
पुणे : पुणे शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी तो पुन्हा वाढू नये, यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली असून नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. गेल्या ५ दिवसात विनाकारण घराबाहेर पडणार्या व नियमभंग करणार्या तब्बल २३ हजारांवर कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर २३ मार्चपासून पुणे शहरासह राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यात विनाकारण प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरात संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर सुरुवातीलचे काही दिवस पोलिसांनी लोकांना समजावून सांगण्यावर भर दिला होता. त्यानंतर रस्त्यावरील गर्दी कमी झाली होती. गेल्या काही दिवसात पुन्हा रस्त्यावरील गर्दी वाढू लागली. पोलीस अडवितात, म्हणून अनेक जण कॅबचा वापर करु लागले. रस्त्यावरील मोटारींची संख्याही वाढू लागली. त्याची दखल घेत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच वरिष्ठ अधिकारी स्वत: रस्त्यावर उतरुन नाकाबंदीची तपासणी करण्यास सुरुवात केली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज कम्प, महात्मा गांधी रोड, बंडगार्डन परिसरात फिरुन नाकाबंदीच्या अंमलबजावणीची पाहणी केली. तेथील अधिकारी करत असलेल्या कामाचे कौतुक करुन त्यांना आवश्यक सूचना दिल्या.
गेल्या एप्रिल महिन्यात जवळपास ३० हजार जणांवर कारवाई करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर पुणे शहरातील सर्वच यंत्रणा खडबडून जागी झाली. गेल्या गुरुवारपासून अधिक कडक अंमलबजावणी करण्यात येऊ लागली. गेल्या गुरुवारी दिवसाला प्रथमच साडेतीन हजारांहून अधिक नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर दररोज साधारण साडेचार हजार जणांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
नागरिकांना अत्यावश्यक किराणा, दुध, भाजीपाला खरेदीसाठी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे. त्यानंतर रस्त्यावर येणार्या प्रत्येक वाहनांची नाकाबंदीच्या ठिकाणी चौकशी केली जात आहे. बाहेर येण्याचे कारण विचारले जात आहे. त्यामुळे अनेकदा नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनांचा रांगा लागलेल्या दिसून येत आहे. रिक्षा, कॅबमधून जाणार्यांवरही कारण विचारले जात आहे.
.........
किरकोळ कारण सांगून घराबाहेर पडणार्यांची संख्या गेल्या काही दिवसात वाढलेली दिसून आल्याने कारवाईची तीव्रता वाढविण्यात आली आहे. वैध कारणासाठी बाहेर पडल्यांना त्रास होणार नाही. मात्र विनाकारण बाहेर पडल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या चार दिवसांपासून दर रोज साधारण ४ हजार जणांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही कारवाई अशीच सुरु राहणार आहे.
डॉ. रवींद्र शिसवे, सह पोलीस आयुक्त, पुणे