मद्यप्रेमींनो, घरबसल्या मागवा आपल्या आवडीचे मद्य; उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 03:51 PM2021-04-10T15:51:03+5:302021-04-10T16:03:48+5:30
घरपोच सेवा स्वतःला उभारावी लागणार
पिंपरी : पुण्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने येत्या तीस एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घातले आहेत. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी कडक टाळेबंदी असणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि मद्य विक्री करणाऱ्या दुकानांना घरपोच सेवा देण्यास परवानगी दिली आहे.
ग्राहकांना हॉटेल आणि बार मध्ये जाऊन पदार्थ घेण्यास मनाई आहे. त्यांना ई- कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून खाद्यपदार्थ मागविता येतील. मद्य विक्री दुकानांना अॅपद्वारे तसेच घरपोच सुविधेद्वारे सेवा देत येईल. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत घरपोच सेवा देता येईल. नियमानुसार मद्य विक्री ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून देता येणार नाही. घरपोच मद्य सेवा देण्यात अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
मागच्या वर्षी अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे मद्य दुकाने मद्यप्रेमींना बंद झाली होती. तब्बल दीड एक महिना सर्व दुकाने बंद होती. त्याचा मद्यप्रेमींना झटका आणि सरकारला चांगलाच फटका बसला होता. मे महिन्यात परत दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला.आणि त्यानंतर कोरोनाचा विसर पडल्यागत नागरिकांनी दुकानांसमोर अक्षरश : भल्या मोठ्या रांगा लावत मद्याची खरेदी केली होती. मद्यप्रेमींनी त्यावेळी राज्य सरकारच्या महसुलात भरीव योगदान दिले होते.त्यामुळे यावेळी लॉकडाऊन करताना राज्य सरकारने ऑनलाईन मद्य विक्रीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.मात्र यात आता मद्य विक्रेत्यांची कसरत होणार असून त्यांना घरपोच मद्यविक्रीसाठी यंत्रणा उभारावी लागणार आहे.
बार आणि वाईन्स शॉपला घरपोच सेवा देता येणार आहे. मात्र त्यासाठीची यंत्रणा त्यांना स्वतःलाच उभारावी लागेल. शिवाय त्यासाठी केवळ त्यांच्याच कामगारांची नेमणूक करावी लागेल. ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांचा उपयोग त्यांना करता येणार नाही.
----
ई कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून मद्य पुरविता येत नाही. त्यांना घरपोच सेवा स्वतः उभारावी लागेल. कमी मनुष्यबळात हे काम अवघड आहे. तसेच, बार चालकांनी छापील किंमतीवर मद्य विकल्यास त्यांना परवडणार नाही. कारण त्यांना मद्यावर मूल्यवर्धित कर भरावा लागतो. बार चालकांनी उन्हाळ्यासाठी बीअरचा अधिक साठा ठेवला होता. बीअर सहा महिन्यात खराब होते. त्यामुळे बीअर विक्रीवर बारचालकांचा अधिक भर असेल. गणेश शेट्टी, अध्यक्ष, पूना हॉटेल, रेस्टॉरंट अँड बार असोसिएशन
-----
उत्पादन शुल्क विभागाबरोबर वाईन्स शॉप चालकांचा नोकरनामा असतो. अशा नोंदणीकृत व्यक्तिंच्या माध्यमातून घरपोच सेवा द्यावी लागेल. शिवाय ग्राहकांपर्यंत दुकानाचा मोबाईल क्रमांक कसा पोचवायचा, कमी मनयुष्यबळामध्ये मालाचा पुरवठा कसा करणार? दुकान उघडल्या शिवाय मद्य पुरवठा करता येणार नाही. उत्पादनशुल्क विभागाकडून त्याबाबतचे स्पष्ट आदेश हवेत. अजय देशमुख, सचिव, पुणे डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट असोसिएशन
----
ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपनी मार्फत मद्य पुरवठा करता येणार नाही. दुकानाबाहेर मोबाईल क्रमांक द्यावा. त्या माध्यमातून मागणी नोंदवून घरपोच पुरवठा करावा. या पूर्वी घरपोच सेवेबाबत दिलेली नियमावली कायम आहे. संतोष झगडे, अधीक्षक, उत्पादनशुल्क, पुणे