वसंत मोरे मराठा समाजाचे उमेदवार होणार? मनोज जरांगेंची भेट घेणार, पुण्यात मोठा ट्विस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 09:24 AM2024-03-27T09:24:14+5:302024-03-27T09:26:02+5:30
Vasant More Pune Lok Sabha 2024: सकल मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावल्यामुळे मराठा समाजाकडून वसंत मोरे यांना उमेदवारी मिळणार का आणि मराठा समाज पाठिंबा देणार का, यावरून चर्चांना उधाण आले आहे.
Vasant More Pune Lok Sabha 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटप आणि उमेदवारांवरून अद्यापही खल सुरू असताना, पुणे लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून पदरी मोठी निराशा पडल्यानंतर निवडणूक लढवण्यावर ठाम असलेल्या वसंत मोरे यांनी आता मराठा समाजाला साद घातल्याचे पाहायला मिळत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उभारलेल्या लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाची बैठक घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार एक बैठक पुण्यात पार पडल्याचे वृत्त आहे. मात्र, ही बैठक वसंत मोरे यांच्या उपस्थितीमुळे अधिक लक्षवेधक ठरल्याची चर्चा आहे. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि भाजपाकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, काही झाले तरी निवडणूक लढवणार अशी ठाम भूमिका वसंत मोरे यांनी घेतली आहे. तसेच पाठिंबा मिळण्यासाठी वसंत मोरे यांचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून वसंत मोरे यांनी सकल मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावल्याचे बोलले जात आहे.
वसंत मोरे मराठा समाजाचे उमेदवार होणार?
अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार का, याबाबत वसंत मोरे यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. वसंत मोरे यांनी सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या बैठकीला हजेरी लावताना, पुण्यात खासदार होण्यासाठी सकल मराठा समाज आणि वंचितने सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. तसेच पुणे लोकसभेतून १०० टक्के मीच खासदार होणार असा दावा वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा केला आहे. तसेच येत्या काही दिवसांत वसंत मोरे हे मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता मराठा समाजाकडून वसंत मोरे यांना उमेदवारी मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पुणे लोकसभा निवडणुकीत यंदा वेगळा प्रयोग पाहायला मिळेल, असे वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. वसंत मोरे हे नगरसेवक असले तरी, मराठा समाजाच्यादृष्टीने पुणे लोकसभेसाठी ते ताकदीचा उमेदवार ठरु शकतात, अशी चर्चा आहे. तसेच पुण्यातील मराठा समाज वसंत मोरे यांच्या पाठिशी उभा राहून आपली ताकद दाखवून देणार का, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागल्याचे सांगितले जात आहे.