पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी फळभाज्या व पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. मागणीच्या तुलनेतच आवक झाल्याने भेंडी, वांगी, हिरव्या मिरचीचे दर स्थिर आहेत.
कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात व परिसरात दुष्काळी स्थिती असली तरी परराज्यातून फळभाज्यांची मोठी आवक होत आहे. आवक स्थिर असल्याने पालेभाज्यांच्या दरातही वाढ झालेली नाही.
भेंडीला क्विंटलला ३,००० ते ४,००० हजार रुपये दर मिळाला, तर गवारीला ५,००० हजार ते ६,००० रुपये आणि हिरव्या मिरचीला १,००० ते २,००० रुपये दर मिळाला. शेतकऱ्यांकडे जुना कांदा शिल्लक असून, बाजारात नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. कांद्याला क्विंटलला २०० ते ८०० रुपये दर मिळत आहे.