राजू इनामदार
पुणे : येतो सकाळी १० वाजता असे सांगत थेट दुपारी १२ वाजता निवांत जाण्याची सवय आता पुणेकरांना हळूहळू सोडावी लागणार आहे. रेल्वेप्रवासाचा कंटाळा म्हणून मुंबई टाळणाऱ्यांच्या आता थेट अंगणातच मेट्रोच्या रूपाने रेल्वे आली असून ती पकडण्याकरता म्हणून त्याला आता धावावेच लागणार आहे.
रस्त्याच्या वरून २८ मीटर उंचीवरून धावणारी हे एक वैशिष्ट्य वगळता मेट्रोचा सगळा कारभार रेल्वेसारखाच आहे. ती वेळेवर धावते. त्यासाठी स्थानकात जावेच लागते. स्थानकात ती जेवढा वेळ थांबेल त्यावेळातच तिच्यात बसावे लागते. बसायला जागा मिळाली नाही तर उभेच रहावे लागते. वेळ चुकली की गाडी हुकली. लवकर बसले नाही की स्थानकात थांबावे लागणार. लवकरच उतरले नाही तर मग गाडीतच अडकून रहावे लागणार.
वेळ वाचावा म्हणून धावावेही लागणार
मेट्रोची रेल्वेपेक्षा वेगळी असणारीही काही वैशिष्ट्ये प्रवाशांना धावपळ करावीच लागेल अशी आहेत. दोन मजली स्थानकात पहिल्या मजल्यावर तिकीट काढून दुसऱ्या मजल्यावर जावे लागते. तिकिटावरचा क्यूआर कोड स्कॅन केल्याशिवाय दुसऱ्या मजल्यावर जाणारा दरवाजा खुलाच होणार नाही अशी व्यवस्था आहे. स्थानकात जाण्यायेण्यासाठी साधा जीना, सरकता जीना व लिफ्ट अशा तीन व्यवस्था आहे. तिथे रांग, तिकीट काढण्यासाठी रांग, स्थानकात जाण्यायेण्यासाठी रांग, मेट्रोने प्रवास करताना अशी प्रत्येक ठिकाणी रांग लावावी लागणार आहे व वेळ वाचावा म्हणून धावावेही लागणार आहे.
मेट्रो आली हो अंगणी
मुंबईत लोकल गाठण्यासाठी अशीच धावपळ करावी लागते, नकोच ती असली धावपळीची मुंबई, बरे आमुचे निवांत पुणे आम्हाला असे पुणेकर कायम म्हणत आलेत. आता मात्र त्यांना नेहमीचा प्रख्यात निवांतपणा टाकून देऊन अंगी मुंबईकरांची धावपळ बनवायची वेळ आली आहे, कारण मेट्रो आली हो अंगणी असे झाले आहे.