पुणे : गणेश मंडळांचा विरोध, महापालिकेतील सभागृहात झालेले आरोप-प्रत्यारोप व मानाच्या गणपतींनी बुधवारी दिलेला पाठिंबा अशा सर्व घडामोडींमध्ये, अखेर गुरूवारी मध्यरात्रीनंतर संभाजी पुलावर (लकडी पुल) पोलिस बंदोबस्तात मेट्रोचे गर्डर टाकण्यात आले. रात्री पावणे एक वाजता क्रेनच्या सहाय्याने गर्डर उभे करण्याचे काम सुरू झाले ते शुक्रवारी सकाळी सातपर्यंत पूर्ण करण्यात आले. वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील वनाज पासून गरवारे महाविद्यालयापर्यंतचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. मात्र संभाजी पुलावरील काम गेल्या चार महिन्यांपासून विरोधामुळे बंद होते. गणेश विसर्जन मिरवणुकीला या मेट्रो पुलाचा अडसर ठरणार असल्याचे सांगत गणेश मंडळांनी या कामाला आक्षेप घेतला होता़ मेट्रो व्यवस्थापनाने अन्य पर्याय व्यवहार्य नसल्याचा अहवाल दिल्यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही मेट्रोच्या कामाला संभाजी पुलावर विरोध चालूच होता.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाने केला होता विरोध सोमवारी (दि़२१) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाने संभाजी पुलावरील मेट्रो पुलाच्या उंचीवरून तीव्र विरोध केला होता. यावेळी झालेल्या आरोप प्रत्यारोपात सत्ताधारी भाजपने राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांनीच पोलिस बंदोबस्तात काम सुरू करण्याचे आदेश दिले असल्याचे महामेट्रोचे पत्रच माध्यमांना दिले. यामुळे २२ डिसेंबरच्या रात्री हे काम सुरू होईल अशी शक्यता होती. मात्र हे काम २३ डिसेंबर रोजी म्हणजे गुरूवारी रात्री पावणे एक वाजता सुरू झाले. दरम्यानच्या काळात संंभाजी पुलावर दोन्ही बाजूने येणारी वाहतुक पूर्णत: बंद
संभाजी पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या पोलिस बंदोबस्तात पुलावर रात्री पावणे एक वाजता गर्डर टाकण्याचे काम सुरू झाले. साधारणत: सात तास चाललेल्या या कामामध्ये मेट्रो मार्गिकेच्या एका बाजूचे गर्डन फिट करण्यात आले असून, दुसऱ्या बाजूचे गर्डन पुढील आठवड्यात बसविण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळात संंभाजी पुलावर दोन्ही बाजूने येणारी वाहतुक पूर्णत: बंद करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी सात वाजता हे काम संपले असले तरी, साधारणत: साडेअकरापर्यंत या पुलावरून सर्व वाहतुक बंदच होती. या काळात पुलावर गर्डर उभारणीसाठी उभारण्यात आलेली यंत्रणा, मोठे क्रेन हटविण्यात आले़ यावेळी वाहतुक बंद असल्याने येथील वाहतुकीचा ताण मात्र शहरातील पेठांमधील रस्त्यांवर, नदीपात्रातील रस्त्यावर तसेच झेड पुलावर मोठ्या प्रमाणात आला होता.