पुणे : मिशन बिगीन अंतर्गत राज्य शासनाकडून लोकल सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्याच आधारे काही प्रमुख्य शहरांतर्गत रेल्वेसेवा करण्याचे नियोजन मध्य रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे. त्याअंतर्गत पुणे ते मुंबईदरम्यान प्रगती, सिंहगड, इंटरसिटी व डेक्कन एक्सप्रेस या गाड्या सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. यासंदर्भातील मध्य रेल्वेच्या मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांचे परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.मागील सहा महिन्यांपासून पुणे व मुंबईदरम्यानची रेल्वेसेवा बंद आहे. या दोन शहरांमध्ये दररोज ये-जा करणारे अनेकजण आहेत. लॉकडाऊन काळात त्यांना खासगी वाहनांनी ये-जा करावी लागत होती. आता एसटी सेवा सुरू झाल्याने काही दिलासा मिळाला आहे. मात्र, एसटीचा तिकीट दर परवडत नसल्याने रेल्वेसेवा सुरू करण्याची अनेक दिवसांची मागणी आहे. शासनाने नुकतीच लोकल सेवा सुरू करण्यास मान्यता दिल्याने इंटरसिटी रेल्वेही सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेचे परिपत्रक व्हायरल झाले आहे.महाराष्ट्र शासनाच्या ३० सप्टेंबरच्या आदेशानुसार आंतरराज्य रेल्वेगाड्या सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याचे परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे. या गाड्यांमध्ये डेक्कन, इंटरसिटी, सिंहगड व प्रगती एक्सप्रेसचा समावेश आहे. तसेच मुंबई अमरावती एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, तपोवन, सिध्देश्वर, महालक्ष्मी, हुतात्मा, महाराष्ट्र, पुणे-नांदेड, पुणे-नागपुर, पुणे-नागपुर गरीबरथ, पुणे-भुसावळ एक्सप्रेस आदी गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान, मध्य रेल्वचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी याबाबत आतापर्यंत अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगितले.--------------दिवाळी व छट पुजेनिमित्त पुण्यातून गोरखपुर, वाराणसी, लखनऊ, मडगांव व दरभंगा या गाड्या सोडण्याचेही प्रस्तावित आहे. तसेच मुंबईतूनही या ठिकाणांसह हावडा या मार्गावर गाडी सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याचे परिपत्रकावरून स्पष्ट होते.------------
पुणे-मुंबई दरम्यान रेल्वेसेवा सुरू होणार? मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांचे परिपत्रक 'व्हायरल'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2020 9:12 PM
राज्य शासनाकडून लोकल सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे.
ठळक मुद्देआंतरराज्य रेल्वेगाड्या सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याचे परिपत्रकात नमूद