पुणे : मुठा कालवा दुर्घटनेमध्ये बाधीत झालेल्यांना तातडीने निवासाची साेय राष्ट्रीय सेवा दलाच्या रावसाहेब पटवर्धन शाळेकडून करण्यात अाली. बाधीतांना तातडीने निवाऱ्याची साेय करणे अावश्यक असल्याने शाळेने अापली जागा त्यांना उपलब्ध करुन दिली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेचे अाभार देखील मानले परंतु गेल्या तीन दिवसांपासून या शाळेत रहिवासासाठी असलेल्या बाधितांना भेटण्यासाठी किंवा त्यांची व्यवस्था इतरत्र करण्यासाठी महापाैर तसेच पालिकेच्या पदाधिकाऱ्यांपैकी काेणीही अाले नाही. शाळेत काही अाधीच ठरलेले कार्यक्रम उद्या हाेणार असल्याने शाळेचा हाॅल रिकामा करुन द्यावा लागणार अाहे. त्यामुळे अाता करायचे काय असा प्रश्न शाळा प्रशासनापुढे निर्माण झाला अाहे.
राष्ट्र सेवा दलाच्या रावसाहेब पटवर्धन शाळेत मुठा कालव्याच्या अपघातातील पीडीतांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. यात महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले यांचा समावेश आहे. शाळेतील एक मोठे सभागृह व दोन वर्गात पीडीतांना तात्पुरत्या स्वरुपात राहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गुरुवारी घटना घडल्यानंतर त्यापुढील दोन दिवस शाळेतच त्यांना निवारा व जेवण देण्यात आले. रविवारी पटवर्धन शाळेच्या नाथ पै सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने त्या सभागृहातील पीडीतांची व्यवस्था पालिकेच्या अन्य शाळेत करण्यात यावी. असे संस्थेच्या पदाधिकारी वर्षा गुप्ते यांनी म्हटले आहे. वास्तविकतः पालिकेने बाधितांची व्यवस्था महानगरपालिकेच्या शाळेत किंवा इतरत्र करणे अावश्यक अाहे. परंतु ज्या शाळेने या पिडीतांना मदत केली, त्याच शाळेवर त्यांची जबाबदारी पालिका प्रशासनाने टाकली असल्याचे चित्र अाहे. दरम्यान संस्थेच्या पदाधिका-यांनी व स्वयंसेवकांनी पीडीतांकरिता पुढाकार घेवून त्यांना आवश्यक मदत केली असून त्यांच्या जेवणाचा व निवासाचा प्रश्न तात्पुरत्या स्वरुपात सोडवला आहे. शहरातील विविध सेवाभावी संस्थांकडून जेवण उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सकाळी सहा-सातच्या सुमारास शाळेबाहेर पडून रात्री नऊनंतर विश्रांतीकरिता पुन्हा शाळेत पीडीत कुटूंबीय येतात. या शाळेत साधारणपणे दीडशे ते दोनशे पीडीतांच्या निवा-याची सोय करण्यात आली आहे.
विशेषत: लहान बालकांची काळजी घेण्यात आली आहे. कालवा दुर्घटनेत पूर्ण संसार गमावल्यानंतर हाताशी काही शिल्लक नसलेल्या त्या पीडीतांच्या लहान मुलांकरिता काही शिक्षकांनी वस्तुरुपाने मदत केली आहे. लहान बाळांची कपडे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शाळेच्या वेळापत्रकात देखील बदल करण्यात आला असून शनिवारी महिना अखेर असल्याने शाळेला दुपारीच सुटी जाहीर करण्यात आल्याचे गुप्ते यांनी सांगितले. शहराच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात नागरिक व काही संस्था कपडे पाठवित आहेत. पीडीतांकरिता कपडे आरोग्यसेनेच्यावतीने शुक्रवारी व शनिवारी दांडेकर पुल याठिकाणी आरोग्य शिबिर घेण्यात आले.