पुणे : पुणे महापालिकेच्या शाळांमधील 40 गुणवत्त विद्यार्थ्यांना महागड्या मर्सिडीझ बेंझमधून फिरण्याची संधी मिळाली. लाईफस्कूल फाऊंडेशनच्या किप मुव्हींग मुव्हमेंट उपक्रमांतर्गत महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधील सर्वोत्तम गुणांचा विक्रम मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्या कोऱ्या मर्सिडीज बेंझमधून सफर घडवून आणण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलले हाेते. आपल्या मुलांचा होणारा हा कौतुक सोहळा पाहून, बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही केवळ मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे यासाठी रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या आई-वडिलांचे डोळे पाणावले. शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नसते. याचीच प्रचिती विद्यार्थ्यांंनी घेतली आणि यापुढेही अतिशय जिद्दीने शिकून यशस्वी होणार असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.
मुंबई-बँगलोर हायवेवरील बी.यु. भंडारी शोरुमपासून या सफरीला सुरुवात झाली. तसेच यावेळी या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला थरमॅक्स ग्लोबलच्या मेहर पद्मजी, बी.यु.भंडारीचे चंद्रवदन भंडारी, देवेन भंडारी, लाईफस्कूल फाऊंडेशनचे संचालक नरेन्द्र गोईदानी, विकास भंडारी, कुलदीप रुचंदानी, राज मुछाल,भारती गोईदानी उपस्थित होते. लाईफस्कूल फाऊंडेशनच्या किप मुव्हींग मुव्हमेंट या उपक्रमांतर्गत पुण्यातील महानगरपालिकेच्या विविध शाळेत ३ महिन्यात ७ लेक्चर घेतले जातात. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, ध्येयवाद, प्रेरणा निर्माण व्हावी, यादृष्टीने त्यांना शिकविले जाते. जेणेकरुन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण होईल. याच विद्यार्थ्यांमधील सर्वोत्तम विद्यार्थ्यांना मर्सिडीज बेंझमध्ये बसण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.