समान पाणी योजनेच्या कामावरून पुणे महापालिकेतील भाजपामध्ये दुहीची बिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 03:47 PM2017-12-01T15:47:32+5:302017-12-01T16:50:13+5:30

समान पाणी योजनेच्या कामावरून महापालिकेतील भारतीय जनता पक्षात दुहीची बिजे उगवलेली दिसू लागली आहे. ९८ या सदस्यसंख्येमध्ये तब्बल ४० जण पक्षातच पण दुसऱ्या गटाकडे झुकू लागल्याचे दिसत असल्याने पक्ष पदाधिकाऱ्यांना त्यांना आवरायचे कसे असा प्रश्न पडला आहे.

Pune Municipal Corporation's bjp corporators divided on water scheme | समान पाणी योजनेच्या कामावरून पुणे महापालिकेतील भाजपामध्ये दुहीची बिजे

समान पाणी योजनेच्या कामावरून पुणे महापालिकेतील भाजपामध्ये दुहीची बिजे

googlenewsNext
ठळक मुद्दे९८ या सदस्यसंख्येमध्ये तब्बल ४० जण पक्षातच पण झुकू लागले दुसऱ्या गटाकडेसत्ताप्राप्ती झाल्यानंतर काकडे यांनी महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात दिले नाही लक्ष

पुणे : समान पाणी योजनेच्या कामावरून महापालिकेतील भारतीय जनता पक्षात दुहीची बिजे उगवलेली दिसू लागली आहे. ९८ या सदस्यसंख्येमध्ये तब्बल ४० जण पक्षातच पण दुसऱ्या गटाकडे झुकू लागल्याचे दिसत असल्याने पक्ष पदाधिकाऱ्यांना त्यांना आवरायचे कसे असा प्रश्न पडला आहे. या ४० जणांमधील बहुतेकजण दुसऱ्या पक्षांमधून ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश करते झालेले आहेत.
भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे महापालिका निवडणुकीच्या आधीपासून शहरात सक्रिय झाले. निवडणुकीत त्यांनी आक्रमक भूमिका घेत पक्षाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधातही वक्तव्ये करण्यास मागेपुढे पाहिले नाही. त्यांच्याच पुढाकाराने दुसऱ्या पक्षातील अनेकांना भाजपाने प्रवेश तर दिलाच शिवाय उमेदवारीही दिली. त्यातील अनेकजण निवडून आले. त्यामुळेच पक्षाची सदस्य संख्या एकदम ९८ झाली. तेही भाकित काकडे यांनी निवडणूक निकालाच्या आधीच केले होते. त्याचीही शहरभर चर्चा होऊन त्यात भाजपाचे मुळ पदाधिकारी झाकोळले गेले होते. 
सत्ताप्राप्ती झाल्यानंतर मात्र काकडे यांनी महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांना मानणारे सर्व नगरसेवक शांत होते. वादाचे विषय होऊनही त्यांनी कधीही पक्षाच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली नाही. कुजबूज असायची, मात्र एकत्र येऊन काही तक्रार करण्याचा विषय कधीही झाली नाही. समान पाणी योजनेतील मीटर खरेदीचा विषय मात्र आता कळीची मुद्दा बनू पहात आहे. त्यावरूनच काकडे यांच्या समर्थकांनी गुरूवारी सकाळी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या योजनेतील अनेक त्रुटी मांडल्या. महापालिका पदाधिकाऱ्यांकडून आपल्याला दुर्लक्षित केले जात आहे अशी भावनाही या सर्व नगरसेवकांनी खासदार काकडे यांच्याकडे व्यक्त केली असल्याचे समजते.
सभागृहात पाणी योजनेवर चर्चा सुरू असताना काकडे समर्थक नगरसेवकांनी अचानक विरोधक करीत असलेल्या मागणीला दुजोरा दिला. विरोधकांनी एक अमेरिकन कंपनी या योजनेसाठी अत्याधुनिक मीटर देत असताना त्याची माहिती घेईपर्यंत फेरनिविदेची प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी केली होती. त्याला सत्ताधारी गटातीलच शंकर पवार, राजेंद्र शिळीमकर व अन्य काही नगरसेवकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले व पिठासीन अधिकारी म्हणून बसलेले सुनील कांबळे यांनी आयुक्त आल्यानंतर पाहू यात काय करायचे ते असे सांगत वेळ मारून नेली व सभा तहकूब केली.
मात्र आता त्यानंतर या नगरसेवकांनी थेट काकडे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे तक्रारी केल्या. काकडे यांनी त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्यापर्यंत पोहचवण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आता महापालिकेतील भाजपा पदाधिकारी तसेच पक्षसंघटनेतील पदाधिकारीही धास्तावले आहेत. याकडे दुर्लक्ष केले तर शक्तीचा अंदाज येऊन काकडे गट अधिक आक्रमक होईल व काही कारवाई केली तर हाती कोलीत दिल्यासारखे ते प्रत्येकच गोष्टीला विरोध करू लागतील अशा दुहेरी कात्रीत भाजपाचे पदाधिकारी सापडले आहेत. 

 

आमच्याकडे गट वगैरे काही नाही. काही नगरसेवक माझ्याकडे आले, त्यांनी त्यांना खटकणाºया काही गोष्टी मला सांगितल्या. मलाही त्यात तथ्य वाटले. मी ते मुख्यमंत्र्यांना सांगणार. एवढेच आहे. पक्षाची प्रतिमा खराब होईल असे काहीही महापालिकेत सत्ता असताना घडू नये असे मला वाटते, व त्यासाठीच मी काही गोष्टीत लक्ष घालत असतो.
- संजय काकडे, खासदार 


भाजपात गटतट नाहीत. नगरसेवकांची आमची संख्या बरीच मोठी आहे. त्यात व्यक्तीपरत्वे काही मतभेद असणे स्वाभाविक आहे, तसे ते आहेत. त्यात विशेष काही नाही. पक्ष म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत. पक्षानेच आम्हाला ताकद दिली आहे, त्यामुळे पक्षाचे अहित होईल असे काहीही होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही.
- श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते, महापालिका
 

Web Title: Pune Municipal Corporation's bjp corporators divided on water scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.