पुणे : टेबलावरील कागदपत्र आणि फाईलींचे ढीग कमी करुन कामामध्ये सुसूत्रता आणि सलगता आणण्याकरिता पालिकेची कार्यालये ‘पेपरलेस’ केली जाणार आहेत. याची सुरुवात विद्यूत विभागापासून करण्यात आली असून या विभागाच्या आवक-जावक आणि कार्यालयीन कागदपत्र आता ऑनलाईन तपासून ऑनलाईनच ‘क्लिअर’ केली जात आहेत. त्यावरील आवश्यक स्वाक्षरीही अधिकारी मोबाईल अथवा संगणकावरुन व्हर्चुअली करीत आहेत. यापुढे फायलींचा प्रवासही ऑनलाईनच होणार असल्याचे विद्यूतचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी सांगितले.
पालिकेच्या संकेतस्थळाच्या डोमेनमध्ये विविध विभागांचे स्वतंत्र आयपी तयार करण्यात आलेले आहेत. विद्यूत विभागाला स्वतंत्र लॉग-इन देण्यात आलेले आहे. विद्यूत विभागाकडे येणारी पत्रे, टपाल आदी कागदपत्रे स्कॅन करुन या आयपीवर टाकले जातात. ही कागदपत्रे वरिष्ठ अधिका-यांकडे फॉरवर्ड होतात. आवश्यक असलेल्या कागदपत्रांची मान्यता, स्वाक्षरी या ऑनलाईन पद्धतीनेच केल्या जात आहेत. अधिकारी कार्यालयातील संगणकावर अथवा मोबाईलवरही लॉग-ईन करुन काम करु शकणार आहेत.
कार्यालयीन कामकाजाच्या तसेच ठेकेदार, बिले आदींच्या फाईल्सही ऑनलाईन आणल्या जाणार आहेत. फायलींचा प्रवास कोणत्या टेबलवरुन कुठे होतो आहे?, कोणत्या टेबलावर संबंधित फाईल किती दिवस पडून आहे याचीही माहिती समजणार आहे. त्यामुळे कामात सुसूत्रता येणार आहे. भ्रष्टाचारालाही पायाबंद बसण्यास मदत मिळणार आहे.===पालिकेच्या विद्यूत विभागाचे काम ‘पेपरलेस’ करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तुर्तास आवक-जावक आणि कागदपत्रांसंबंधी काम ऑनलाईन केले जात आहे. पर्यावरणपूरक व भ्रष्टाचाराला पायाबंद घालण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होईल. फायलींबाबतची ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पालिकेचे सर्व विभाग हळूहळू पेपरलेस करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्यूत विभाग