पुणे मनपाचे नवीन अंदाजपत्रक सादर, मनपाच्या शाळांमधील मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 12:26 PM2018-02-27T12:26:30+5:302018-02-27T12:26:30+5:30
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या पावलावर पाऊल ठेवत स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी देखील वास्तवाचे भान ठेवत कोणत्याही नवीन योजनांचा भडीमार न करता व मागील वर्षापेक्षा ४२ कोटींने कमी ५ हजार ८७० कोटींचे अंदाजपत्रक मंगळवारी रोजी मुख्य सभेला सादर केले.
पुणे - महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या पावलावर पाऊल ठेवत स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी देखील वास्तवाचे भान ठेवत कोणत्याही नवीन योजनांचा भडीमार न करता व मागील वर्षापेक्षा ४२ कोटींने कमी ५ हजार ८७० कोटींचे अंदाजपत्रक मंगळवारी ( 27 फेब्रुवारी ) रोजी मुख्य सभेला सादर केले. प्रशासनाच्या वतीने ५ हजार ३९७ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते.
शहराच्या विस्तारीकरणाच्या वेगासोबत पायाभूत सुविधांची उपलब्धता त्याच गतीने वाढविण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मेट्रो, पीएमपीएमलचे सक्षमीकरण, सायकल योजना, इंटरनेटला गती देण्यासाठी केबल डक्टचे जाळे, 24 तास पाणी पुरवठा आणि नदी सुधार योजना मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
यासोबतच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नव्याने उड्डाणपूल, बोगदा आणि महत्त्वाकांक्षी एचसीएमटीआर मार्गाचे काम सुरू करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. जुन्या योजना कायम ठेवताना लोकानुनाय करणार्या योजना यंदा जाणीवपूर्वक टाळण्यात आल्या आहेत, असा दावा मोहोळ यांनी यावेळी केला.
याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, मनसेचे गटनेते वसंत मोरे, रिपाइंच्या गटनेत्या वाडेकर, एमआयएमच्या गटनेत्या अश्विनी लांडगे, अतिरिक्त आयुक्त शीतल उगले याप्रसंगी सभागृहात उपस्थित होत्या.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, की मेट्रोचे काम सुरु झाले आहे. त्याला गती देण्यासाठी राज्य शासन तसेच पालिका स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी बस खरेदी, बस डेपोसाठी जागा आणि त्यांचा विकास करण्याचा निर्णय या अगोदरच झाला आहे. यासोबतच सायकल योजनेला मंजुरी देण्यात आली असून लवकरच सायकल ट्रॅकची कामे सुरू होतील. महापालिकेचा बहुचर्चित एचसीएमटीआर मार्गाचे काम सुरु करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. राज्य शासनाने विकास आराखडा मंजूर केल्याने या मार्गाचे काम सुरु करण्यात येईल. प्रामुख्याने सिंहगड रस्ता परिसरातुन शहराला जोडणारा एकच मार्ग असल्याने सततची वाहतूक कोंडी ही ता भागातील मोठी समस्या आहे. या करिता सिंहगड रस्त्यावर उड्डाणपूल तसेच तळजाई ते सिंहगड रस्ता जोडण्यासाठी बोगद्याचे काम यावर्षी सुरु करण्याचे नियोजन आहे. तसेच सिंहगड रस्ता आणि कर्वे नगर ला जोडण्यासाठी नदीवरील उड्डाणपुलाचे कामही सुरू करण्यात येणार आहे.