पुणे महापालिका मोजते श्वानांची संख्या ‘अंदाजे’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 01:47 PM2019-12-17T13:47:33+5:302019-12-17T13:49:51+5:30
आकड्याबाबत साशंकता : शहरात दोन ते अडीच लाख श्वान असल्याचा दावा
पुणे : शहरात भटक्या श्वानांनी उच्छाद मांडलेला असून श्वानदंशाच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. श्वानांचे प्रजनन रोखण्याकरिता पालिकेकडून त्यांची नसबंदी केली जाते. शहरात दोन ते अडीच लाख भटके श्वान असल्याचा आकडा पालिकेकडून सांगितला जात आहे. परंतु, हा आकडा केवळ ‘अंदाजा’च्या आधारावर निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे या आकड्यांबाबतच साशंकता निर्माण झाली आहे.
दरवर्षी पालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये आरोग्य विभागासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. आरोग्य विभागांतर्गत येत असलेल्या व्हेटर्नरी विभागाकडून श्वानांच्या नसबंदीचे काम केले जाते. पालिकेकडे श्वानांना या नसबंदीकरिता दिल्या जाणाऱ्या भूलीच्या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालेला आहे. वर्षाकाठी हजारोंच्या संख्येत श्वानदंशाच्या घटना घडतात. नागरिकांसह ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांना भीतीच्या छायेखाली रस्त्यांवरून जावे लागत आहे. दुचाकीचालकांच्या तर अंगावर धावून जाण्याचे प्रकार वाढल्याने किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात घडत आहेत. श्वानांना चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक वाहनचालक गंभीररीत्या जखमी झाल्याचीही उदाहरणे समोर आली आहेत.
गेल्या वर्षभरात श्वानदंशाच्या दहा हजार घटना घडल्या आहेत. आतापर्यंत ७५ हजार श्वानांची नसबंदी करण्यात आल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. तरीदेखील श्वानांची शहरातील संख्या कमी होताना दिसत नाही. मुळातच श्वानांच्या नसबंदी केंद्राची क्षमता कमी आहे. त्यातच भुलीचे औषध आणि लसींची उपलब्धताही कमी आहे. पालिकेकडून शहरात एक ते दीड लाख श्वान असावेत आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील एक लाख श्वान असे एकूण दोन ते अडीच लाख श्वान शहरात असल्याचे सांगितले जात आहे.
......
श्वानांची संख्या कमी न होण्यामागे निकृष्ट दर्जाच्या औषधांचा वापर, श्वानांच्या नसबंदीकडे होणारे दुर्लक्ष कारणीभूत ठरत आहे. शहरात सर्वत्र श्वानांच्या टोळ्या फिरताना दिसतात.
नागरिक त्रस्त झालेले असताना पालिकेला मात्र हे श्वान सापडत नाहीत. श्वान पकडायला जाणारे वाहन येताच त्याच्या वासाने
श्वान पसार होतात असे कारण दिले जाते.
.......
पालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये श्वानांच्या नसबंदी शस्त्रक्रियेकरिता दोन ते अडीच कोटींची तरतूद करण्यात येते. यातील सर्वच निधी खर्च होत नाही. गेल्या तीन वर्षांत ३३ हजार श्वानांची नसबंदी करण्यात आली आहे.
...........
2शहरात डॉ. नायडू रुग्णालयात २० ते २५ श्वानांची तर केशवनगर-मुंढवा येथे ५५-६० श्वानांच्या शस्त्रक्रियेची सुविधा आहे. ही क्षमता वाढविण्याची गरज आहे.
....
श्वान नसबंदीची आकडेवारी.....
वर्ष नसबंदी
२०१६-१७ ९७०२
२०१७-१८ ११,७०७
२०१८-१९ ११,९०९
.....
श्वानदंशाची आकडेवारी
२०१६-१७ : १७, ८२८
२०१७-१८ : १०, ३४०
२०१८-१९ : ९,९७२