पुणे | मोजणीच्या बंदोबस्तासाठी गेले अन् गावकऱ्यांनी मिष्टान्न जेवून पाठवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 07:31 PM2022-04-19T19:31:33+5:302022-04-19T19:52:36+5:30
पुणे : सध्या जिल्ह्यात रिंगरोड, पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी जमिन मोजणी प्रक्रिया सुरू आहे. पंधरा दिवसांपर्वी ...
पुणे : सध्या जिल्ह्यात रिंगरोड, पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी जमिन मोजणी प्रक्रिया सुरू आहे. पंधरा दिवसांपर्वी खेडसह अनेक गावांमध्ये रिंगरोडच्या मोजणीला प्रचंड विरोध होत असताना रिंगरोडसाठी देण्यात आलेले कोट्यावधीचे पॅकेज आणि प्रशासनाने खुबीने ठराविक लोकांचा विरोध मोडून काढला. यामुळेच खेड तालुक्यातील सर्वाधिक विरोध असलेल्या मोई गावांत मंगळवार (दि.19) रोजी मोजणीसाठी गेलेल्या अधिकारी, कर्मचारी, बंदोबस्तातील पोलिसांचे जाहीर स्वागत करत चक्क मिष्टान्न जेवून पाठवले.
पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेला रिंगरोड अखेर प्रत्यक्षात अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पूर्व आणि पश्चिम रिंगरोड असा दोन टप्प्यात या रिंगरोडचा विकास करण्यात येणार आहे. आतापर्यंत पश्चिम भागातील रिंगरोडसाठीची जमिन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. यात पहिल्या टप्प्यात 37 गावांपैकी 36 गावांची मोजणी पूर्ण झाली असून, या पैकी 32 गावांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. तर 7 गावांचे दर अंतिम झाले आहेत.
या गावांमध्ये लवकरच खरेदीखत सुरू करण्यात येणार आहे. रिंगरोडला सर्वाधिक विरोध खेड तालुक्यातून होता. खेड तालुक्यातील विरोधाचे लोण नंतर संपूर्ण जिल्ह्यात पसरले. याचा परिणाम ज्या गतीने पश्चिम रिंगरोडची मोजणी पूर्ण झाली, ती गती पूर्व रिंगरोडला मिळत नव्हती. परंतु पंधरा दिवसांपूर्वी खेड प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या कार्यालयात जाऊन काही आंदोलकांनी कायदा हातात घेत गोंधळ घातला. यानंतर संबंधित आंदोलकांवर कारवाई करत पोलिसांनी अटक केली. या कारवाई नंतर बहुतेक सर्व विरोध मोडून काढण्यात आला. रिंगरोडसाठी खेड तालुक्यातील 12 गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. यापैकी गेल्या आठ दिवसांत 10 गावांमध्ये मोजणी पूर्ण झाली असून, दोन गावांची मोजणी दोन दिवसांत पूर्ण होईल, असा विश्वास खेड प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केला.
मोजणी अधिका-यांसाठी गावांत जेवणाच्या पंगती दुर्मीळ योग
खेड तालुक्यात सुरूवातील रिंगरोडसाठी प्रचंड विरोध होता. शेतक-यांच्या जमिनी घेताना जास्तीत जास्त दर दिला जाईल यासाठी जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांची सतत आग्रह धरला व प्रशासनाला स्पष्ट सूचना देखील दिल्या. तसेच स्थानिक पातळीवर देखील संबंधित शेतक-यांशी नियमित संपर्क करून रिंगरोडचे महत्त्व व त्यांना मिळणारा मोबदला यांची माहिती देण्यात आली. यामुळेच प्रथमच मोजणीसाठी गेलेल्या अधिकारी कर्मचारी यांचे स्वागत करून गावांमध्ये जेवणाच्या पंगती उठल्या हा खरा तर दुर्मीळ योग असून, खेड तालुक्यातील शेतक-यांनी वेगळा आदर्श घालून दिला.
- विक्रांत चव्हाण, खेड प्रांत अधिकारी