पुणे : पुणे शहर पोलिस दलाने गेल्या दोन दिवसात विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्ली येथे केलेल्या कारवाई करुन तब्बल २ हजार २०० कोटी रुपयांचे ११०० किलोपेक्षा अधिक एमडी ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर सांगलीत पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल १० किलो एमडी मिठाच्या पाकिटातून जप्त करण्यात आले आहे. सांगलीतून कुरिअरद्वारे पुढे पाठवण्यात येणार होते. अजून ५० किलो एमडी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कुरकुंभ एमआयडीसीमधील अर्थकेम कारखान्यावर छापा मारून जवळपास ६०० किलोपेक्षा अधिक एम डी जप्त केले होते. पोलिसांनी कंपनी मालक साबळे आणि त्याच्यासाठी एम.डी.चा फॉर्म्युला तयार करणाऱ्या केमिकल इंजिनिअरला ताब्यात घेतले आहे. दरम्यान कंपनीतून पुणे शहर, दिल्ली, मुंबई, मिरा-भाईंदर, बंगलोर आणि हैद्राबाद अशा मेट्रोसिटीत एमडीची पुरवाठा झाल्याचे लक्षात आल्याने अनेक राज्यात पथके रवाना झाली आहेत.
कुरकुंभमधील अर्थकेम लॅबोरेटरीजमध्ये निर्मिती
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत औषध निर्मितीच्या नावाखाली मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची निर्मिती केली जात होती. हैदर शेख यांच्या विश्रांतवाडी येथील गोदामामधून ५५ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या गोदामामध्ये मीठ आणि रांगोळीचा साठा करून ठेवण्यात आलेला होता. पांढऱ्या क्रिस्टल्स प्रमाणे दिसणारे मेफेड्रोन हे छोट्या छोट्या पाकिटांमध्ये भरून ही पाकिटे मिठाच्या मोठ्या पाकिटांमध्ये लपवली जात होती.