सतीश वाघ खून प्रकरणात पुणे पोलिसांना मोठे यश; दोन संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 08:06 PM2024-12-10T20:06:59+5:302024-12-10T20:08:05+5:30
या प्रकरणी पुणे पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
पुणे - भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (वय ५५) यांचे मंगळवारी पहाटे अपहरण करून खून करण्यात आला. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाटात मंगळवारी रात्री त्यांचा मृतदेह सापडला. अशात आता पोलिसांकडून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, सतीश वाघ हे हडपसर भागातील मांजरी फार्म परिसरात वास्तव्यास होते. हडपसर परिसरात त्यांचा नावलौकिक होता. विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे ते सख्खे मामा होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते. घरापासून काही अंतरावर जातात चौघांनी त्यांना जबरदस्तीने चार चाकी वाहनात बसवले. त्यानंतर त्यांचे अपहरण करून घेऊन गेले. दरम्यान सतीश वाघ यांना गाडीत डांबून येत असताना एका नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार पाहिला आणि वाघ यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली.
वाघ कुटुंबीयांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस तपास करत असताना मंगळवारी सायंकाळी शिदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला. शिंदवणे घाटातून काही नागरिक जात असताना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह त्यांना दिसला. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सतीश वाघ यांच्या संपूर्ण अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याची दिसून आले. याशिवाय मृतदेहाजवळ लाकडी दांडके ही होते. या दांडक्याने वाघ यांच्या डोक्यावर वार करण्यात आले. त्यानंतर मृतदेह शिंदवणे घाटात टाकून आरोपी पसार झाले. अपहरण केल्यानंतर काही तासातच आरोपींनी सतीश वाघ यांचा खून केला असण्याची शक्यता आहे. पोलिसांची १६ पथके या गुन्ह्याच्या तपासासाठी कामाला लागले आहेत. श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसकडून सुरू आहे.