पुणे : पुणे वाहतूक पाेलिसांनी नियम माेडणाऱ्या वाहनाचालकांवर कडक कारवाई करण्यास सुरवात केली आहे. पाेलीस करत असलेल्या नाकाबंदीमध्ये अनेक वाहनांची तपासणी करण्यात येते. यात वाहनचालकाचा कुठला दंड पेंडिंग आहे का याची देखील पाहणी करण्यात येते. आज सहकारनगर येथे वाहतूक पाेलिसांनी एका दुचाकी चालकाकडून तब्बल 11 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे. या आधी देखील एका चारचाकी चालकाकडून 24 हजारांचा दंड वसूल करण्यात आला हाेता.
पुण्यात वाहनांची संख्या ही लाेकसंख्येपेक्षा अधिक आहे. त्यातच दुचाकींची संख्या अधिक असल्याने नियम माेडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पुणे वाहतूक पाेलिसांकडून जानेवारीपासून हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी चालकांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. त्याचबराेबर झेंब्रा क्राॅसिंगवर उभ्या असणारे वाहनचालक, विरुद्ध दिशेने येणारे वाहनचालक, माेबाईलवर बाेलत वाहन चालवणारे वाहनचालक यांच्यावर सीसीटिव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. सीसीटिव्हीच्या माध्यमातून दंड केल्यानंतर वाहनचालकाला त्याच्या माेबाईलवर नियम माेडल्याचा तसेच किती दंड किती आहे याचा मेसेज येताे. जेव्हा केव्हा पाेलीस त्या वाहनाची तपासणी करतात, पाेलिसांना या आधी माेडलेल्या सर्व नियमांची तसेच पेंडिंग असलेल्या दंडाची माहिती मिळते. अशावेळी त्या वाहचालकाकडून तात्काळ दंड वसूल करण्यात येताे.
आज सहकारनगर येथे वाहतूक पाेलिसांनी एका दुचाकीचालकाच्या वाहनाची तपासणी केली. त्यात त्या वाहनावर 11 हजार 400 रुपयांचा दंड असल्याचे समाेर आले. पाेलिसांनी या वाहनचालकाकडून तात्काळ दंड वसूल केला. याविषयी बाेलताना वाहतूक विभागाचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर म्हणाले, सध्या वाहतूक पाेलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. पाेलिसांसाठी एक अॅप तयार करण्यात आले असून त्यात एखाद्या गाडीचा क्रमांक टाकल्यास त्यावर किती दंड आहे हे पाेलिसांना कळते. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन केले, नियम माेडले नाहीत तर दंड भरण्याची वेळ येणार नाही.