बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 12:30 PM2024-06-01T12:30:13+5:302024-06-01T12:31:37+5:30
Pune Porsche Accident: बिल्डर बाळाला वाचविता वाचविता बाप, बापाचा बाप आणि आता आईही जेलमध्ये... पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे.
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी महत्वाच्या घडामोडी घडू लागल्या आहेत. बाप, आजोबा, बिल्डर बाळानंतर आता त्या बाळाची आई देखील गजाआड झाली आहे. आज पुणे पोलिसांनी बिल्डर बाळाच्या आईला शिवानी अग्रवालला अटक केली आहे. ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने ज्या दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्यांनी बदलले ते रक्त कोणाचे होते, याबाबत पोलिसांना धागेदोरे मिळाल्याचे सांगितले जात आहे.
ते बदललेले रक्त बिल्डर बाळाच्या आईचे होते, असा संशय पोलिसांना आहे. यामुळे आज या शिवानी अग्रवालला तिच्या बाळासमोर बसवून पोलीस चौकशी करणार आहेत. तसेच तिचे रक्त देखील तपासणीसाठी घेण्यात येणार आहे. या टेस्टमध्ये जर शिवानी सापडली तर तिच्याही अडचणी वाढणार आहेत.
लाडक्या बाळाला वाचवा म्हणून पोलिसांना हाक देणाऱ्या शिवानी अग्रवाल यांचा पुणे पोलिसांनीच पर्दाफाश केला आहे. बिल्डर बाळाचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हा याच शिवानी अग्रवाल यांनी तो फेक असल्याचे म्हणत आपल्या मुलाला संरक्षण द्या असे आवाहन पोलिसांना केले होते. यावेळी त्यांनी डोळ्यातून अश्रूही काढले होते. परंतु हे करताना त्यांनी बाळाला वाचविण्यासाठी रक्ताचे सॅम्पल बदलणे, डॉक्टरांना पैसे पुरविणे आदी प्रतापही केले होते.
पोलिसांच्या सुत्रांनुसार शिवानी अग्रवाल यांनी ससूनमध्ये जात त्यांचे ब्लड सँम्पल दिले होते. बिल्डर बाळाचे ब्लड सँम्पल या आईच्या सॅम्पलने बदलण्यात आले होते. डॉ. श्रीहरी हळनोर याने हे सॅम्पल बदलले होते. यासाठी त्याला तीन लाख रुपये देण्यात आले होते. तर आता हळनोरच्या दाव्यानुसार त्याच्यावर वरिष्ठ डॉक्टरने दबाव आणला होता. यानंतर केलेल्या चुकीची जाणीव होताच त्याने ससूनच्या वरिष्ठांना माफीनामाही लिहून दिला होता. तसेच या प्रकरणात अडकत असल्याचे पाहून त्याने आत्महत्येचा विचारही केला होता.
यापूर्वी पुणे पोलिसांनी अल्पवयीन कारचालकाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक केली आहे. हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास पोलिसांनी शिवानी अग्रवाल यांना देखील अटक केली.