पुणे : ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ स्टुडन्ट्स फेडरेशन आॅफ इंडियातर्फे (एसएफआय) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित निषेध सभा उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा प्रकार केल्याचा आरोप एसएफआयने केला आहे. भारतमाता की जय, वंदेमातरम्, नक्षलवाद मुर्दाबाद अशा घोषणा देऊन निषेध सभा उधळून लावण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे विद्यापीठात काही काळ तणावाचे वातवरण निर्माण झाले होते.विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांमध्ये काही महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. एसएफआय व अभाविप या दोन संघटनांमधील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यावर दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले होते.परिणामी चतु:शृंगी पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना अटक करून न्यायालयात दाखल केले होते. सध्या हे कार्यकर्ते जामिनावर बाहेर आहेत. दरम्यान, गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी निषेध सभा आयोजित केली होती. त्यावर पुन्हा एकदा वाद निर्माण झाला. विद्यापीठाच्या अनिकेत कँटीनसमोर सायंकाळी सातच्या सुमारास निषेध सभेला सुरुवात झाली. काही विद्यार्थ्यांनी विचारवंतांच्या हत्येबाबत मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे निषेध सभा घेण्याबाबत निवेदन दिले होते. विद्यापीठाचे सुरक्षारक्षक या ठिकाणी हजर होते; परंतु काही विद्यार्थ्यांनी येथे येऊन घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावर विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने पोलिसांना बोलावले. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शांत करण्यात आले. साडेनऊच्या सुमारास हा वाद मिटला.
पुणे: गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध : सभा उधळून लावण्याचा प्रयत्न,विद्यार्थी संघटना आमनेसामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 2:18 AM