India Post : पोस्टाच्या पाकिटांवरून देशभर पोहोचणार पुण्याची अंजिरे
By नितीन चौधरी | Published: October 12, 2022 02:07 PM2022-10-12T14:07:38+5:302022-10-12T14:24:35+5:30
तुम्ही सासवडला गेल्यावर अंजीर खाल्ली का, असा प्रश्न जरूर विचारला जातो....
पुणे : शेती उत्पादनात पुणे जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे, असा साधा प्रश्न विचारल्यास तुमच्या डोळ्यासमोर पुरंदरची अंजिरे, मावळातला आंबेमोहोर, जुन्नरचे टोमॅटो येतात. अंजीर व आंबेमोहोर या दोन उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळालेच आहे. आता हेच तीन पिके पोस्टाच्या पाकिटांवरही अवतरली आहेत.
तुम्ही सासवडला गेल्यावर अंजीर खाल्ली का, असा प्रश्न जरूर विचारला जातो. राज्यातील बहुतांश जणांना याची कल्पना आहे. आता देशभर पुण्याच्या अंजिरांची ख्याती पोहोचणार आहे. त्यामुळे बाहेरील राज्यातील लोकांच्या तोंडातही पुण्याच्या अंजिरांची गोडी पोहोचणार आहे. अंजिरासह आंबेमोहोर तांदळाची, टोमॅटोचीही प्रसिद्धी होणार आहे.
भारतीय पोस्टाने पुण्याच्या उत्पादनांना हा सन्मान दिला आहे. ही तिन्ही उत्पादने पोस्टाच्या पाकिटांवर झळकली आहेत. भौगोलिक मानांकनप्राप्त आंबेमोहोर तांदूळ, पुरंदर, अंजीर आणि ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ या गटातील टोमॅटोही उत्पादने देशभर जाणार आहेत.
‘आझादी का अमृतमहोत्सव’ वर्षातील ‘फिलेटेली’ दिनानिमित्त या विशेष टपाल आवरणांचे विमोचन पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांच्या हस्ते झाले. यावेळी डाकसेवा संचालक सिमरन कौर, डेक्कन फिलाटेलिक सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. अंजली दत्ता, कर्नल आर. के. चव्हाण (निवृत्त), अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संशोधन संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब काळभोर, मुळशी तालुका आंबेमोहोर संवर्धन संघाचे अध्यक्ष हरिष मेंगडे उपस्थित होते.
भौगोलिक मानांकनप्राप्त या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राज्यभर राबविण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यांतही असेच अनावरण करण्यात आले आहे. ही विशेष पाकिटे पुणे हेड पोस्ट ऑफिस, पुणे सिटी पोस्ट ऑफिस आणि पुणे टपाल क्षेत्रातील नगर, बारामती, कराड, पंढरपूर, सातारा, सोलापूर आणि श्रीरामपूर येथील सर्व मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
- रामचंद्र जायभाये, पोस्टमास्टर जनरल
या विशेष पाकिटांमुळे कार्यालयीन संवादाद्वारे पुण्याच्या या खासियतची प्रसिद्धी होणार आहे. राज्यात याबाबत माहितीच आहे. मात्र, यानिमित्ताने अंजीर, आंबेमोहोर व टोमॅटो देशभर पोहोचणार आहे. त्यातून मार्केटिंगलाही हातभार लागणार आहे.
- रोहन उरसळ, अंजीर निर्यातदार, सासवड.