पुण्यात मार्चमधील १० वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 01:24 PM2019-03-26T13:24:12+5:302019-03-26T13:29:48+5:30
हवामानातील आद्रता कमी झाल्याने शहरातील कमाल व किमान तापमानात अचानक वाढ झाल्याने सोमवारी मार्च महिन्यातील गेल्या १० वर्षातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे़.
पुणे : हवामानातील आद्रता कमी झाल्याने शहरातील कमाल व किमान तापमानात अचानक वाढ झाल्याने सोमवारी मार्च महिन्यातील गेल्या १० वर्षातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे़. सोमवारी पुण्यातील कमाल तापमान ४०़२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून पुढील दोन दिवस तापमान असेच वाढते राहण्याची शक्यता आहे़.
गेल्या दहा वर्षातील मार्च महिन्यातील पुणे शहरातील कमाल तापमानावर नजर टाकली असता याअगोदर फक्त २०१७ मध्ये २८ व २९ मार्च रोजी कमाल तापमान ४०़१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते़. मार्च मध्ये पुणे शहरात सर्वात ४२़८ अंश सेल्सिअस कमाल तापमान २८ मार्च १८९२ मध्ये नोंदविले गेले होते़.
पुणे शहरात रविवारी कमाल तापमान ३८़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते़. त्यात सोमवारी तब्बल १़८ अंशाने वाढ झाली़ सरासरी तापमानापेक्षा सोमवारी ३़९ अंश अधिक होते़. शहरातील किमान तापमानातही हळू हळू वाढ झाली असून सोमवारी सकाळी १८ अंश सेल्सिअसने नोंदविले गेले़ ते सरासरीच्या तुलनेत १़६ अंशाने अधिक आहे़.
शहरातील वाढत्या तापमानाची जाणीव सोमवारी सकाळपासूनच जाणवू लागली होती़. वातावरणातील वाढत्या उष्मामुळे उन्ह जसे वाढू लागले तशा घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या़. शहरातील सिग्नलला मिनिट, दोन मिनिट जरी थांबले तरी उन्हाचा चटका जाणवत होता़. सायंकाळ झाल्यानंतर ऐरवी गार वारे वाहत असत़ सोमवारी मात्र सायंकाळ झाल्यानंतरही उष्ण वारे जाणवत होते़ .
गेल्या दहा वर्षाती पुण्यातील मार्च महिन्यात कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
२७ मार्च २०१८ ३८़७
२८ व २९ मार्च २०१७ ४०़१
२६ मार्च २०१६ ३९़१
२२ व २८ मार्च २०१५ ३८
३१ मार्च २०१४ ३८़८
२६ मार्च २०१३ ३६़९
२१ मार्च २०१२ ३९़१
३० मार्च २०११ ३८़१
२२ मार्च २०१० ३९
३१ मार्च २००९ ३९
२१ मार्च २००८ ३८़६