पुणेकरांनो सावधान, आता शहरात रात्री आठनंतर सकाळी ७ नंतर संचारबंदीचाही आदेश लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 08:32 PM2021-03-29T20:32:49+5:302021-03-29T20:33:09+5:30
रविवारपासून (२८ मार्च) रात्री आठनंतर संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
पुणे : कोरोना संसर्गामुळे शहरात रात्री ८ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदीचे (५ किंवा ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येणे वा फिरण्यास मनाई करणारा) आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कलम १८८ तसेच साथ रोग अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आदेश सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिले आहेत.
रविवारपासून (२८ मार्च) रात्री आठनंतर संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पुढील आदेशापर्यंत दररोज रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यापूर्वी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत शहरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते.
संचारबंदीच्या आदेशातून अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवा तसेच वस्तू याबाबतच्या सवलती व इतर निर्बंध समाविष्ट असतील.
संचारबंदीचे आदेश लागू केल्यानंतर रात्री कामावरुन घरी परतणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच वैद्यकीय कारणासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची अडवणूक करण्यात येऊ नये, असे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील प्रमुखांना देण्यात आले आहेत.
संचारबंदीच्या काळात एखादी व्यक्ती कामावरुन घरी निघाली असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. मात्र, त्यासाठी त्यांनी कार्यालयीन ओळखपत्र बाळगावे. मात्र, रात्री ८ नंतर एखादी व्यक्ती विनाकारण फिरत असेल तर त्यांच्यावर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असे डॉ. शिसवे यांनी नमूद केले.