Pune Metro: पुणेकर म्हणतात, 'भोसरी स्टेशन' हे नाव चुकीचं; थेट नाव बदलण्याची केली मागणी...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 03:20 PM2022-03-15T15:20:57+5:302022-03-15T15:21:41+5:30
पुण्यातील गरवारे ते वनाज या मेट्रोचे उदघाटन झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३ च्या सुमारास पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो सुरु करण्यात आली
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील गरवारे ते वनाज या मेट्रोचे उदघाटन झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३ च्या सुमारास पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो सुरु करण्यात आली. पुणेकरांनी अतिशय उत्साहात मेट्रोने प्रवास केल्याचे दिसून येत होते. अवघ्या ८ दिवसात मेट्रोला २ लाख २७ हजार ९५० प्रवासी मिळाले. त्यांच्याकडून मेट्रोला ३२ लाख ४५ हजार ६७३ रूपयांचे उत्पन्न मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यातच आता प्रवाशांच्या तक्रारीचा पाढा सुरु झाल्याचे दिसत आहे. पिंपरी चिंचवड भागातील भोसरी स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गरवारे ते वनाज बरोबरच पिंपरी ते फुगेवाडी हा मार्ग गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आल्या. भोसरी स्थानकामुळे प्रवाशांमध्ये विशेषत: गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे-मुंबई महामार्गालगत नाशिक फाटा येथे हे स्थानक असताना त्याला ‘भोसरी स्टेशन’ असे नाव देण्यात आले आहे. त्या स्थानकापासून भोसरी स्टेशन जवळपास १० किलोमीटर लांब आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणी येणार आहेत. स्थानिक नागरिकांना भोसरी आणि नाशिक फाटा या भागाबद्दल माहिती आहे, परंतु नवीन माणसाचा स्टेशनच्या नावावरून गोंधळ होण्याची शकयता आहे.
नागरिक काय म्हणतात?
नवीन व्यक्तीने भोसरी सांगितल्यावर त्यांना या स्टेशनला सोडले जाते. पण भोसरी नसून हे नाशिक फाटा आहे. भोसरी या पासून १० किलोमीटर लांब आहे. मेट्रो स्टेशनच्या या चुकीच्या नामकरणामुळे त्यांचा बराच वेळ वाया गेला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.
स्थानकांची नावे देण्याबाबत भविष्यात काळजी घ्यावी
आम्ही भोसरी स्थानकाच्या नामकरणावर तीव्र आक्षेप घेतला असून त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महामेट्रोने हे नाव बदलावे. तसेच, त्यांनी स्थानकांची नावे देण्याबाबत भविष्यात काळजी घ्यावी असंही काही जण म्हणाले आहेत.
तब्बल ८ वर्षांनी पुणेकरांना मेट्रो मिळाली
२०१४ साली पुणे मेट्रोला मंजुरी मिळाली होती. तर २०१६ साली मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. आता तब्बल ८ वर्षांनी पुणेकरांना मेट्रोचा सुखद प्रवासाचा अनुभव मिळाला आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत असंख्य नागरिक मेट्रोने प्रवास करण्यासाठी अजूनही येत आहेत. प्रत्येक ठिकाणी फोटो सेशन सुरु असल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यातच मेट्रो प्रशासनाने अशी चुकीची कामे करू नये असे नागरिकांनी सांगितले आहे.