पुणे : पुणे शहरात एकाच दिवशी तीन गाेळीबाराच्या घटना घडल्या असल्याने शहरात एकच खळबळ उडाली अाहे. चंदननगर, येवलेवाडी अाणि पुणे स्टेशन येथे घडलेल्या घटनांमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून पुणे स्टेशन येथे पाेलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर अाराेपींनी गाेळी झाडल्याने ते गंभीर जखमी झाले अाहेत. तर तिसऱ्या घटनेत सराफ दुकानात करण्यात अालेल्या गाेळीबारात एक कर्मचारी गंभीर जखमी झाला अाहे.
अाज पुण्यात विविध तीन ठिकाणी गाेळीबाराच्या घटना घडल्या असल्याने शहरात दहशतीचे वातावरण अाहे. अाज सकाळी चंदननगर येथील अानंद पार्क चाैकातील इंद्रायणी गृहरचना साेसायटीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी (वय 34 ) या महिलेवर सकाळी अाठ वाजून पंधरा मिनिटांनी दाेन तरुणांनी घरात घुसून महिलेच्या छातीत गाेळ्या झाडून हत्या केली. दाेन तरुण दुचाकीवरुन इंद्रायणी साेसायटीत अाले. अाराेपींनी भाटी यांच्या घराची बेल वाजवली. भाटी यांनी दार उघडताच अाराेपींनी गाेळीबार केला. या गाेळीबारात भाटी यांचा मृत्यू झाला. याच गुन्ह्यातील अाराेपी हे झेलम एक्सप्रेसने पळून चालले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 2 ला मिळाली हाेती. या माहितीच्या अाधारे युनिट 2 चे पाेलीस निरीक्षक गजानन पवार हे त्यांच्या सहकाऱ्यांसाेबत अाराेपींचा संध्याकाळी 5.15 च्या सुमारास प्लॅटफाॅर्म क्र. 3 वर शाेध घेत हाेते. त्यावेळी अाराेपींनी पाेलिसांना पाहताच पळून जायचा प्रयत्न केला. यावेळी तिघा अाराेपींपैकी एकाने पवार यांच्यावर गाेळी झाडली. पवारांच्या पाेटात गाेळी लागल्याने माेठा रक्तस्त्राव झाला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले. दरम्यान पवार यांच्या सहकाऱ्यांनी एका अाराेपीला पकडले तर रेल्वे पाेलीस अाणखी एका अाराेपीला पकडण्यात यशस्वी झाले. तिसरा अाराेपी पळून गेला.
तिसरी घटना काेंढवा येथील येवलेवाडीमध्ये भर बाजारपेठेत असलेल्या गणेश ज्वेलर्स या दुकानात घडली. या दुकानातील कामगारावर गाेळीबार करण्यात अाला अाहे. यात दुकानातील कामगार अमृत मेघावल गंभीर जखमी झाला अाहे. त्याला हाताला गाेळी लागली. अाज दुपारच्या सुमारास गणेश ज्वेलर्स या दुकानात चार व्यक्ती अाल्या. त्यांनी अमृत बराेबर चर्चा केली. त्यानंतर त्यातील एकाने अमृतवर गाेळी झाडल्याचे सीसीटिव्ही मध्ये दिसत अाहे. यानंतर हल्लेखोर दोन दुचाकीवरून कात्रजच्या दिशेने फरार झाले. या दुकानाचे मालक मालतसिंग ओदसिंग देवठी हे त्यांच्या गावी मागील आठ दिवसांपासून गेलेले आहेत. तेव्हापासून अमृत हा एकटाच दुकान सांभाळत आहे. विशेष म्हणजे दुकानातील कोणत्याही सोन्या-चांदीच्या वस्तू हल्लेखोरांनी चोरल्या नाहीत किंवा तसा प्रयत्न केल्याचेही दिसून येत नाही. यामुळे हा दरोड्यांचा प्रयत्न होता की यामागे वेगळे कारण आहे, याचा अधिक तपास कोंढवा पोलीस करीत आहेत. दरम्यान या गाेळीबारा मागील कारण अद्याप स्पष्ट हाेऊ शकले नाही.