पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात पुणे स्मार्ट सिटीचे आक्षेपार्ह 'ट्विट' : शिवसेना आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 08:47 PM2021-05-22T20:47:04+5:302021-05-22T20:55:41+5:30
सोशल मीडियाचे कंत्राट घेतलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याचा प्रताप....
पुणे : 'स्मार्ट सिटी'च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह शेरेबाजी करणारे ट्विट करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एकदा नव्हे तर दोनदा हे ट्विट करण्यात आले. हा प्रकार स्मार्ट सिटीच्या सोशल मीडिया हँडल करण्याचे काम घेतलेल्या दिल्लीच्या कंपनीच्या कर्मचाऱ्याने केल्याचे समोर आले आहे. शिवसेनेने आक्रमक होत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे ट्विटर अकाऊंट आणि सोशल मीडियाचे कंत्राट दिल्लीच्या 'कुटुंब एचआर' यांच्याकडे देण्यात आलेले आहे. आमदार निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान असलेले ट्विट दोन दिवसांपूर्वी केले होते. 'ज्याची सोसायटीचा वॉचमन व्हायची लायकी नाही. त्याला आमदार केल्यावर लोकांना त्रास भोगावाच लागतो. वरळीकर टीव्हीवर पेंग्विन बघितला, तरी शिव्या घालतायत म्हणून मतदान करताना विचार केला पाहिजे. नाहीतर असा मनस्ताप होतो.' असे या ट्विटमध्ये नमूद केले होते.
स्मार्ट सिटीचे पुण्याचे काम पाहणाऱ्या सोशल मीडिया आयटी स्पेशलिस्टकडून सोशल मिडीयावर कंपनीशी संबधित नसलेले हे राजकीय स्वरुपाचे ट्विट शेअर करण्यात आले. ही बाब शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आली. पालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी पदाधिकाऱ्यांसह स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. संजय कोलते यांची भेट घेऊन हे ट्विट तात्काळ डिलीट करावे तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी केली.
स्मार्ट सिटीकडून संबंधीत महिला कर्मचाऱ्याला तात्काळ काढून टाकण्यात आले असून भविष्यात कोणत्याही कर्मचाऱ्याकडून अशा प्रकारची चूक झाल्यास कुटुंब एचआर कंपनीसोबत करण्यात आलेला करार रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासोबतच सोशल मिडीयाचे फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि स्मार्ट सिटी वेबसाईटचे कामकाज मुख्य अधिकारी अनिरुध्द शहापुरे यांचेकडे सोपविण्यात आले आहे.