पुणे-सोलापूर महामार्ग : टोलवसुली पट्ट्यात दिशादर्शकांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 02:33 AM2018-04-04T02:33:11+5:302018-04-04T02:33:11+5:30
पुणे-सोलापूर महामार्गाच्या टोलवसुली पट्ट्यात सुविधांबाबत कमालीची दुरवस्था असतानाही टोलवसुली कंपनीचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.
उरुळी कांचन - पुणे-सोलापूर महामार्गाच्या टोलवसुली पट्ट्यात सुविधांबाबत कमालीची दुरवस्था असतानाही टोलवसुली कंपनीचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.
रस्ता दुभाजक उंची कमी झाली आहे, झेब्रा क्रॉसिंग पट्टे नाहीत, दिशादर्शक फलक सुस्थितीत नाहीत, अंतराचे फलक काही ठिकाणी नाहीत तर काही ठिकाणी दुरवस्था झाली आहे, गावांच्या नावांचे फलक योग्य त्या मोठ्या आकाराचे व नेमक्या ठिकाणी नाहीत, सर्व्हिस रस्ते वाहतुकीसाठी नाहीतच त्यावर सगळीकडे अतिक्रमण झाले आहे. ते दूर करून उपयोगात आणणे, मुख्य रस्ता व सर्व्हिस रस्ता यामध्ये असणाऱ्या अनेक ठिकाणच्या लोखंडी जाळ्या तुटल्यात किंवा चोरून नेल्या आहेत.
त्या परत बसविणे यांसारख्या जबाबदाºया टाळणे, धोक्याच्या किंवा अपघातप्रवण क्षेत्रात काही अतिरिक्त सूचनाफलक किंवा हायमास्ट दिवे लावणे, तसेच वेगनियंत्रण करण्यासाठी लालरंगाच्या दिव्यांची व्यवस्था, अशा व अनेक सोयीसुविधा पुरवणे हे या कंपनीने करणे निविदा-शर्तींनुुसार अपेक्षित असताना याकडे या कंपनीने तब्बल
१४ वर्षे झाली पूर्णपणे डोळेझाक केलेली आहे.
फक्त टोलवसुली हेच आपले काम, अशा पद्धतीने त्यांचे काम जोरात सुरू आहे. कंपनीच्या टोलवसुलीची मुदत फक्त दोन वर्षे बाकी असताना ते आता काय लक्ष घालणार, असा सवाल उपस्थित झाला आहे. काही ठिकाणी साईटपट्ट्या ९ इंच ते फुटभर पडलेल्या तर काही ठिकाणी साईटपट्ट्या फुटभर उंच झाल्या आहेत.
अपघातप्रवण क्षेत्र वाहने सावकाश चालवा, असा फलक व धोक्याची सूचना देणारा लाल सिग्नल बसविणे गरजेचे आहे. कोणताही अधिकारी याबाबत कर्तव्य तत्परता दाखवीत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे. संबंधितानी त्वरित लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या भागातील नागरिकांनी व वाहनचालकांनी केली आहे.
शासन व सदरची खासगी कंपनी यांच्यामधील करारानुसार टोलवसुलीपासून ते टोलवसुली संपेपर्यंतच्या कालावधीत या रस्त्याची संपूर्ण देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंपनीची आहे.
सुविधांपासून वंचित : टोल वसुलीत धन्यता
कंपनीने रस्त्याचा संपूर्ण पृष्ठभाग (डांबरीकरणाचा) समपातळीत राखणे, सेवा रस्ता सुस्थितीत ठेवणे व त्यावर अतिक्रमण होऊ न देणे, मुख्य रस्त्याच्या साईडपट्ट्या वापरायोग्य ठेवणे व त्यांची निगा राखणे, गरजेच्या ठिकाणी संरक्षक कठडे लावणे आणि त्याची निगा राखणे, झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारणे, रस्ता दुभाजाकावरील प्रकाश नियंत्रक सुस्थितीत ठेवणे, महामागार्पासून प्रत्येक गावांचा जोडरस्त्याच्या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी नियंत्रक दिवे बसविणे, चौकाच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या प्रकाशझोताच्या दिव्यांची सोय करणे व गरजेच्यावेळी दुरुस्ती करणे, दिशादर्शक फलक, अंतराचे फलक, गावांच्या नावांचे फलक व रहदारीसाठी राष्ट्रीय महामार्ग व परिवहन खात्याच्या नियमावली आणि निर्देशानुसार लावले पाहिजेत, असे फलक लावणे व त्यांची निगा ठेवणे हे जनतेच्या सोयीसाठी त्यांना मिळणाºया पैशांतून पुरविण्याची महत्वाची जबाबदारी या कंपनीवर असतानाही सदर कंपनी आपल्या जबाबदारीचे भान न ठेवता फक्त टोलवसुली करण्यातच धन्यता मानत आहे. जनतेला अनेक सुविधांपासून वंचित ठेवत आहे.