प्रसाद कानडे
पुणे: पुणे - सोलापूर रस्त्यावर दिवसेंदिवस होणारी वाहतूक कोंडीमुळे गतिमान पुण्याला ब्रेक लागत आहे. हडपसर व 15 नंबर चौकात जर वाहतूक कोंडी झाली तर सोलापूर हुन येणाऱ्या वाहनांना मांजरी पासूनच ब्रेक लावत पुण्यात प्रवेश करावा लागतो. काही ठिकाणी रस्ते मोठे तर काही ठिकाणी रस्ते अरुंद आहेत. त्यात सिग्नलहुन आत रस्त्याच्या आतल्या बाजूस येण्यासाठी शेकडो वाहने थांबलेले असतात. त्यामुळे त्याच्या पाठीमागे वाहनांची रांगच लागते. तर दुसरीकडे ह्या मार्गावर कधी काळी बीआरटी ची वाहतूक होते हे सांगणारे अवशेष देखील उपलब्ध आहेत. ह्यामुळे देखील रस्त्यावर कोंडी होत आहे.
पुलगेट ते गाडीतळ पर्यतच्या रस्त्याचा विचार केला तर तर येथे जवळपास 11 सिग्नल आहेत. या मार्गावर भैरोबा नाला, फातिमा नगर, काळूबाई चौक, रामटेकडी चौक हा भाग अत्यंत रुंद आहे. त्यामुळे ह्या भागातून जाताना वाहनांची गती मंदावते. येथे सायकल ट्रॅक केला पण त्याचा वापर सायकलीसाठी होत नाही. तेव्हा ते काढून टाकणे अधिक सोयीचे ठरेल. ह्या मार्गावर प्रवासी वाहनां बरोबरच मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होते. रामटेकडी येथे औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जड वाहतूक त्याकडे वळते. जड वाहतूक देखील अधिक असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्याचाही परिणाम रस्ते वाहतूकिवर होत आहे.
बीआरटीचे राहिले केवळ अवशेष
पुणे - सोलापूर रस्त्यावर कोण्या एके काळी बीआरटी ही वाहतूक सुरू होती हे सांगणारे केवळ आता अवशेष शिल्लक राहिले आहे. तुटलेले दुभाजक ,गतप्राण झालेले बस थांबे हे ताबडतोब बाजूला काढून वाहनांसाठी आता मोकळी जागा उपलब्ध केली पाहिजे. ह्यामुळे देखील वाहतूक कोंडी होत आहे. अनेक ठिकाणी दुभाजक फुटलेले आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावरचे दुभाजक दिसत देखील नाही. त्यामुळे दुचाकी दुभाजकला धडकते तर चारचाकी थेट दुभाजकावर चढते.त्यावेळी वाहतूक सुरळीत करताना मोठ्या अडचणी येतात. हे वाहतूक कोंडीला आमंत्रण देते. ह्यांना आवरणे कठीण चौकाच्या सिग्नल थांबलेल्या दुचाकीस्वार हा लाईन कट करून रस्ताच्या पलीकडच्या बाजूस जाण्यास अतिशय घाई करीत असतो. ही संख्या एक दोन नाही तर शेकडोच्या घरात आहे. त्यामुळे अरुंद रस्त्याने पुढे जाण्यारी वाहने व वळण घेणारि वाहने असे आपोआप दोन भाग तयार होतात. त्यामुळे पाठीमागे वाहनाच्या रांगा लागायला सुरुवात होते. आशा वाहनधारकांना आवरणे कठीण होते. हे देखील वाहतूक कोंडीत आपले योगदान देतात.