पुणे स्थानक बनले दृष्टिहीन प्रवाशांसाठी मैत्रीपूर्ण स्थानक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:16 AM2021-09-16T04:16:42+5:302021-09-16T04:16:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्थानकांवर दृष्टिहीन प्रवाशांसाठी ब्रेल साइनेज ही सुविधा सुरू करण्यात आली. यामुळे दृष्टिहीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे रेल्वे स्थानकांवर दृष्टिहीन प्रवाशांसाठी ब्रेल साइनेज ही सुविधा सुरू करण्यात आली. यामुळे दृष्टिहीन प्रवाशांची सोय होणार आहे. पादचारी पूल (एफओबी), बुकिंग/आरक्षण कार्यालय, वेटिंग हॉल, स्टेशन मास्तरांचे कार्यालय, क्लॉक रूम, शौचालय, प्लॅटफॉर्म रेलिंगसह अनेक ठिकाणी ब्रेल संकेतक (साइनेज) लावण्यात आले. त्यामुळे पुणे रेल्वेस्थानक दृष्टिहीन प्रवाशांसाठीचे सुविधा पुरविणारे मध्य रेल्वेचे तिसरे आणि देशातले १६ वे मैत्रीपूर्ण स्थानक बनले.
पुणे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ब्रेल लिपीमध्ये स्टेशन लेआउट, मानचित्र लावण्यात आले आहे. याद्वारे पुणे स्टेशनवर उपलब्ध विविध प्रवासी सुविधा स्थळांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. मूकबधिर प्रवाशांसाठी स्टेशन परिसरात हे ब्रेल साइनेज स्कॅन करण्याची सोय आहे. जेणेकरून त्यांना व्हिडिओद्वारे माहिती उपलब्ध होईल. शिड्यांच्या पायऱ्यांवर प्रकाशमान होणाऱ्या पट्ट्या लावण्यात आल्या आहेत ज्यामुळे कमी दृष्टी असलेल्या प्रवाशांना सुविधा होईल. स्थानकावर पोर्टेबल रॅम्पसह व्हील चेअर सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्यामुळे दिव्यांग प्रवाशांना गाडीत चढण्यास मदत होईल. स्थानक संचालक सुरेशचंद्र जैन यांच्या हस्ते ह्या सुविधेचे उद्घाटन झाले.
‘अनुप्रयास’ या सामाजिक संस्थेने या सुविधा उपलब्ध करून दिल्यात.