दावे निकाली काढण्यात पुणे पुन्हा अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 01:56 PM2019-12-17T13:56:43+5:302019-12-17T13:59:06+5:30
लोकअदालत : एक लाख १६ हजार ७८४ दावे निकाली
पुणे : पुणे लोकअदालतीने सर्वाधिक खटले निकाली काढत यंदाच्या वर्षीदेखील पहिले स्थान पटकावले आहे. मुंबई राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि मुंबई हायकोर्टाच्या निर्देशाने पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे या वर्षीदेखील लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. चारही लोकअदालतींमध्ये सर्वाधिक दावे पुणे जिल्ह्यात निकाली काढण्यात आले. या चारही लोकअदालतींमध्ये पुणे राज्यात पहिले आहे.
या लोकअदालतीमध्ये एक लाख १६ हजार ७८४ दावे निकाली काढण्यात यश आले. यापूर्वीच्या लोकअदालतीतदेखील पुण्याने सर्वाधिक खटले निकाली काढून पहिल्या क्रमांकावर झेप घेतली होती. पुणे जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा न्यायालयाचे तत्कालीनप्रमुख न्यायाधीश एस. बी. अग्रवाल, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालत आयोजित केली होती.
कोर्टात दाखल असलेले प्रलंबित दावे आणि दाखलपूर्व दावे तडजोडीने आणि परस्परसामंजस्यातून दावे निकाली काढता यावेत म्हणून राज्यात एकाच वेळी एकादिवशी या विशेष उपक्रम लोकअदालतीचे आयोजन करण्यात येते. दर चार महिन्यांनी या लोकअदालतीचे आयोजन करण्यात येते.
.............................
रस्ता ओलांडत असताना झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या कुटुंबीयांना ४ लाख २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या लोकअदालतीत तडजोडीअंती यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य न्यायाधीश पी. आर. अष्टुरकर यांच्या पॅनेलने हा दावा निकाली काढला. दावा दाखल झाल्यानंतर पहिल्याच तारखेला हा दावा निकाली निघाला.
* २५ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास कोथरूड परिसरात ही घटना घडली. घटनेतील मृत व्यक्ती पौडच्या दिशेने पायी चालली होती, त्या वेळी सिमेंट मिक्स करणाºया ट्रकची तिला जोरदार धडक बसली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा बायंडिंगचा व्यवसाय होता. त्यांच्या कुटुंबीयांनी अॅड. उन्मेष देशपांडे यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे रॉयल सुंदरम विमा कंपनी विरोधात दावा दाखल केला होता. अॅड. देशपांडे यांच्याकडून १४ लाख ७५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. लोकअदालतीमध्ये तडजोडीअंती ४ लाख २५ हजार रुपये देऊन हा दावा निकाली काढण्यात आला. विमा कंपनीच्या वतीने अॅड. ऋषीकेश गानू यांनी काम पाहिले.
.................
निकाली काढण्यात आलेल्या दाव्यांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महापालिकांतील करवसुलींच्या दाव्यांची संख्या अधिक आहे. नुकतेच १४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये २६ हजार ७६० दावे निकाली काढण्यात यश आले होते. या लोकअदालतीत सर्वांधिक दावे निकाली काढण्यात पुणे राज्यात पहिले ठरले आहे. या लोकअदालतींमधून दोन अब्ज २२ कोटी ८६ लाख ५९ हजार ८६० रुपयांची नुकसानभरपाई वसूल करण्यात आली. - सी. पी. भागवत (सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण)
..........
लोकअदालत निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आलेले दावे निकाली दावे
१७ मार्च १,४२,७३८ ४४,७०१
१३ जुलै ९३,६९० २८,६६६
१४ सप्टेंबर ८७,९५८ १६,१८३
१४ डिसेंबर ८९,६३५ २६,७६०
महात्मा गांधीच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली विशेष लोकअदालत - ४७४