जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 08:36 PM2019-12-16T20:36:23+5:302019-12-16T20:37:12+5:30
विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करून सरकार विरुद्ध विद्यार्थी करण्याचा संघर्ष पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न..
पुणे : दिल्लीतील जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून निषेध करण्यात आला. विद्यापीठातील अनिकेत कॅन्टीनजवळ जमत विद्यार्थ्यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला.
दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करत आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला. यात अनेक विदयार्थी जखमी झाले. या लाठीहल्ल्याचा पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून निषेध करण्यात आला. अनिकेत कॅन्टीन जवळ जमत विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या. यावेळी विविध सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले.
आंदोलक विद्यार्थी सतीश गोऱ्हे म्हणाला, या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा विरोध करत आहोत. हा कायदा हिंदू मुस्लिमांमध्ये दुफळी निर्माण करणारा आहे. विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करून हा विषय सरकार विरुद्ध विद्यार्थी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु आम्ही तो होऊ देणार नाही. आज देशभरात सर्वत्र आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनावेळी जामिया मिलिया विद्यापीठातील काही विद्यार्थी देखील हजर होते. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 18 तारखेला विद्यार्थ्यांकडून पुणे विद्यापीठात मशाल रॅली देखील काढण्यात येणार आहे.