पुणे: कोरोना परिस्थितीत सुधारणा होत असल्यामुळे बहुतांश सर्वच बाबींवरील निर्बंध उठले असताना, शुक्रवारपासून शहरातील वाद्य पथके, बॅन्ड पथके यांनाही परवानगी दिली गेली आहे. यामुळे गेली दीड- पावणे दोन वर्षे बंद असलेला वाद्यांचा निनाद आता पुन्हा घुमण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश आज जारी केले आहेत. वाद्य पथकांसह बॅन्ड पथकांना परवानगी दिली गेली असली तरी, पथकातील वाद्य वाजवणाऱ्या सर्व व्यक्तींची व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस (मात्रा) पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहणार आहे. तसेच याबाबतची खात्री करण्याची जबाबदारी पथक व्यवस्थापनाची राहणार आहे. सदर आदेश हे महापालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या खडकी व पुणे कॅण्टोंमेंट बोर्डासही लागू राहणार आहेत.