Pune wall collapse : आराेपी बांधकाम व्यावसायिकांना 2 जुलैपर्यंत पाेलीस काेठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 04:17 PM2019-06-30T16:17:49+5:302019-06-30T16:19:03+5:30
काेंढवा येथील आल्कन स्टायलस या इमारतीची सिमाभिंत काेसळून 15 मजूरांचा मृत्यू झाला हाेता. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकांना 2 जुलैपर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत.
पुणे : शुक्रवारी रात्री पुण्यातल्या काेंढवा भागात सिमाभिंत काेसळून 15 कामगारांचा मृत्यू झाला हाेता. याप्रकरणी पाेलिसांनी बांधकाम व्यावसायिक विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल यांना अटक केली हाेती. त्याना आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 जुलै पर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शुक्रवारी रात्री 1.30 च्या सुमारास काेंढवा भागातील आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत काेसळून 15 जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. याप्रकरणी काेंढवा पाेलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला हाेता. या आठ जणांवर सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. कांचन डेव्हलपर्सच्या पंकज व्होरांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आल्कन स्टायलस उभारणाऱ्या चौघांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी आल्कन स्टायलस इमारत उभारणारे बांधकाम व्यावसायिक विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल यांना पाेलिसांनी अटक केली हाेती. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने 2 जुलै पर्यंत आराेपींना पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दरम्यान या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्र्यांनी संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनातून पुणे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच पुणे दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात येईल. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच 24 तासांत या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.