Pune: पॉलिग्राफ, व्हाइस लेअर चाचणीमध्ये फरक काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 12:20 PM2023-06-27T12:20:21+5:302023-06-27T12:20:48+5:30
Polygraph Test: डॉ. प्रदीप कुरूलकर याची पॉलिग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर ॲनालिसिस चाचणी करण्यास परवानगी देण्याची मागणी पुणे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी न्यायालयात केली.
पुणे : डॉ. प्रदीप कुरूलकर याची पॉलिग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर ॲनालिसिस चाचणी करण्यास परवानगी देण्याची मागणी पुणे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी न्यायालयात केली. त्यावर न्यायालयाने एटीएसच्या अधिकाऱ्यांना व्हाइस लेअर ॲनालिसिस चाचणी म्हणजे काय?, पॉलिग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर चाचणी? यात फरक काय, ती कशासाठी केली जाते, यापूर्वी ही चाचणी कोणाची झाली आहे का?, अशी विचारणा केली.
मात्र, अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती देता आली नाही. न्यायालयाने सुनावणी घेण्याआधी दोन्ही चाचण्यांतील फरक स्पष्ट करण्याची सूचना एटीएसला केली. त्यामुळे आता ३० जूनला सुनावणी होणार आहे. पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून कुरूलकर याला ४ मे रोजी अटक करण्यात आली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याची कोठडी संपल्याने न्यायालयात सुनावणी होती.
एटीएसने मागणी केलेल्या ‘पॉलिग्राफ आणि व्हाइस लेअर’ चाचण्या करण्याला डॉ. प्रदीप कुरूलकर याचा नकार आहे. या चाचण्यांसाठी कुरूलकरची परवानगी गरजेची आहे. मात्र, न्यायालयात त्यास विरोध दर्शविणार असल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले. या चाचण्यांची आवश्यकता नसल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांचे म्हणणे आहे.