पुणे : दहा दिवस प्रत्येकाच्या घरात आनंद, चैतन्य घेऊन आलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीला निराेप देण्यात आला. पुण्यातील विविध ठिकाणी तब्बल 3 लाख 55 हजार 154 गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यात 1 लाख 74 हजार 694 पुणेकरांनी पाण्याच्या नैसर्गिक स्त्राेतात गणेश मुर्तीचे विसर्जन न करता हाैद आणि पाण्याच्या टाक्यांमध्ये मुर्तीचे विसर्जन केले आहे. त्याची टक्केवारी 49.18 इतकी आहे.
दरवर्षी लाेखाे गणेशमुर्तीचे नदीमध्ये विसर्जन हाेत असल्याने नदीचे माेठ्याप्रमाणावर प्रदूषण हाेत असते. कुठलिही मुर्ती नदीच्या पाण्यात विरघळत नसल्याने जलचरांचे अस्तित्व देखील धाेक्यात येत असते. त्यामुळे नागरिकांकडून हाैदात गणेशमुर्तीचे विसर्जन करावे असे आवाहन विविध पर्यावरणवादी संस्था आणि महापालिकेकडून करण्यात येत असते. 2015 सालापासून पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे तसेच दगडूशेठ हलवाई गणपतीचे कृत्रिम हाैदात विसर्जन करण्यात येते. यंदाही मानाच्या गणपतीचे हाैदात विसर्जन करण्यात आले. यंदा पुणे महापालिकेच्यावतीने गणेशमुर्तीचे दान करणाऱ्यांना माेफत खताचे देखील वाटप करण्यात आले.
यंदा अनंत चतुर्दशीला माेठ्याप्रमाणावर पुणेकरांनी कृत्रिम हाैद आणि पाण्याच्या टाक्यांमध्ये गणेशमुर्तीचे विसर्जन केले. 93 हजार 470 नागरिकांनी कृत्रिम हाैदात गणेशमुर्तीचे विसर्जन केले. तर 81 हजार 234 नागरिकांनी टाक्यांमध्ये गणेशमुर्ती विसर्जित केल्या. यंदा दान केलेल्या गणेशमुर्तीची संख्या देखील अधिक हाेती. 3 हजार 708 नागरिकांनी गणेशमुर्ती महापालिकेला दान केल्या. पुणेकरांनी पर्यावरणाचे भान राखत हाैदात मुर्ती विसर्जन करण्यास प्राधान्य दिल्याचे समाेर आले.