मारणे काकांची हायटेक रिक्षा; पुण्याच्या रस्त्यांवर अाहे तिचीच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 04:44 PM2018-09-04T16:44:38+5:302018-09-04T16:46:25+5:30
ज्या रिक्षाने अापल्याला वैभव प्राप्त करुन दिले ती रिक्षा अापल्या साेबत सदैव असावी यासाठी पुण्यातील मारणे काकांनी त्यांच्या रिक्षाला एक वेगळाच लूक दिला अाहे.
पुणे : अायुष्यातील 40 वर्षे त्यांनी रिक्षाचा व्यवसाय केला. ज्या रिक्षाने अायुष्यातील सर्व सुख, दुःखात साथ दिली ती रिक्षा सदैव अापल्या साेबत असावी अशी त्यांची इच्छा हाेती. म्हणून त्यांनी थेट अापल्या रिक्षालाच कार करुन टाकली. पुण्यातल्या कृष्णा मारणे यांची ही कहाणी. मारणे काकांनी अापल्या रिक्षालाच फेरारी करुन टाकली अाहे. त्यांच्या या रिक्षाची सध्या पुण्यात चर्चा अाहे.
कृष्णा मारणे यांचा रिक्षाचा व्यवसाय हाेता. अापल्या प्रवाशांना चांगल्या सुखसाेयी द्वाव्यात असे त्यांना नेहमीच वाटायचे. त्यांच्या रिक्षाच्या व्यवसायाने त्यांची चांगली भरभराट झाली. त्यांनी या रिक्षाचा व्यवसाय करत अनेक रिक्षा घेतल्या. त्यांचा व्यवसाय जाेरात चालू लागला. सध्या मारणे काका ट्रान्सपाेर्टचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे विविध ट्रान्सपाेर्टच्या गाड्या अाहेत. ज्या रिक्षामुळे अापण अाज हे वैभव अनुभवताेय ती रिक्षा कायम अापल्या साेबत असावी म्हणून त्यांनी अापल्या रिक्षाला सजवायचे ठरवले. त्यांनी त्यांच्या रिक्षामध्ये हायटेक कारमध्ये ज्या सुविधा असतात त्या सर्व सुविधा बसवल्या अाहेत. कुठलिही महागडी कार घेणे शक्य असताना त्यांनी अापल्या रिक्षालाच कार केली अाहे. त्यांच्या रिक्षामध्ये टिव्ही, एसी, साऊंड सिस्टीम, फायर सेफ्टी, विविध प्रकारच्या अाकर्षक लाईट्स, दर्जेदार कुशन अशा अनेक सुविधा अाहेत. हॅडेलच्या इथे त्यांनी एक स्टिअरिंग सुद्धा बसवले अाहे.
तब्बल सात वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांच्या रिक्षाला त्यांना एक नवीन लुक देता अाला. भवानी पेठेतील सईद दलाल या कारागिराने ही रिक्षा त्यांना तयार करुन दिली. या रिक्षाला अनेक स्पर्धांमध्ये पारिताेषिकं मिळाली अाहेत. काेल्हापुर सुंदरीचा मानही या रिक्षाने पटकावला अाहे. अापण ज्या रिक्षाने सुरुवात केली ती रिक्षा अापल्या साेबत सदैव असावी, तसेच अापल्या नातवंडांना सुद्धा इतिहास माहित असावा यासाठी त्यांनी ही रिक्षा सजवली अाहे. मारणे काका ही रिक्षा स्वतःसाठी वापरतात. कुठेही ही रिक्षा घेऊन गेले की लाेक कुतुहलाने या रिक्षाबाबत चाैकशी करतात असे मारणे काका सांगतात. या रिक्षाची त्यांना काळजी सुद्धा घ्यावी लागते. फारश्या गर्दीच्या नसलेल्या ठिकाणीच ते ही रिक्षा घेऊन जातात. तसेच बाहेर कुठे रिक्षा असल्यास रिक्षासाेबत सदैव काेणीतरी असेल याचीही ते काळजी घेत असतात.