पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात दोन नाट्यगृहांची भर; कोथरूड, येरवड्यात नव्या वास्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:04 PM2018-01-06T13:04:04+5:302018-01-06T13:10:30+5:30

कोथरूड येथील बाळासाहेब ठाकरे कलामंदिर आणि येरवड्यातील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह या दोन वास्तूंच्या रूपाने पुण्याचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध होणार आहे.

Pune's cultural heritage focuses on two theaters; New Vastu at Kothrud, Yerwada | पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात दोन नाट्यगृहांची भर; कोथरूड, येरवड्यात नव्या वास्तू

पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात दोन नाट्यगृहांची भर; कोथरूड, येरवड्यात नव्या वास्तू

googlenewsNext
ठळक मुद्दे७०० आसनक्षमता असलेल्या अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे काम पूर्ण पुढील सहा महिन्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे कलामंदिर रसिकांसाठी होणार खुले

पुणे : नाट्य, कला, साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा जपणाऱ्या पुणे शहरातील रसिकांना नव्या वर्षात दोन नवीन नाट्यगृहांची अनोखी भेट मिळणार आहे. कोथरूड येथील बाळासाहेब ठाकरे कलामंदिर आणि येरवड्यातील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह या दोन वास्तूंच्या रूपाने पुण्याचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध होणार आहे. याचवेळी उपनगरांमधील ओस पडणाऱ्या नाट्यगृहांबाबत महानगरपालिकेतर्फे ठोस तोडगा काढण्यात येणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे माहेरघर असलेल्या पुण्याच्या वैभवात या दोन नाट्यगृहांच्या निमित्ताने भर पडणार आहे. येरवडा येथील गुंजन चित्रपटगृह परिसरात सुमारे ७०० आसनक्षमता असलेल्या अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, लिफ्टचे काम अपूर्ण आहे. नाट्यगृहासाठी आवश्यक सोयीसुविधा आणि कार्यालयीन कामकाजाची व्यवस्था यासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाल्यानंतर काम पूर्णत्वाकडे जाणार आहे.

कोथरूड येथील बाळासाहेब ठाकरे कलामंदिरात ग्रीन रूम, बुकिंग आॅफिस, मेकअप रूम, रंगीत तालमीसाठी छोटा हॉल, उपाहारगृह, स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. कलामंदिरातील वातानुकूलित यंत्रणा, नाट्यगृहातील खुर्च्या आणि अंतर्गत सजावटीची कामे पूर्ण होण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागेल. पहिल्या मजल्यावर बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे, दुर्मीळ छायाचित्रे, त्यांच्या भाषणांच्या सीडी असे स्वरूप असलेले छोटेखानी कलादालन उभे राहणार आहे. नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी या कलामंदिरासाठी पाठपुरावा केल्याची माहिती महानगरपालिकेचे रंगमंदिर प्रमुख प्रकाश आमराळे यांनी दिली.

सध्या १३ सभागृहे 
पुणे महानगरपालिकेतर्फे सध्या बालगंधर्व रंगमंदिर, गणेश कला क्रीडा मंच, पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अण्णा भाऊ साठे नाट्यगृह (पद्मावती), सावित्रीबाई फुले सभागृह, भारतरत्न पं. भीमसेन जोशी नाट्यगृह, महात्मा फुले सभागृह, पं. भीमसेन जोशी कलादालन, विजय तेंडुलकर नाट्यगृह, व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे कलादालन, मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अशा १३ सभागृह आणि कलादालनांचा समावेश आहे.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या आवारात तीन हजार चौरस फुटांचे बांधकाम करण्यात आले आहे. यापैकी दीड हजार चौरस फूट जागेमध्ये छोटेखानी नाट्यगृह उभारण्यात येत आहे. यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 
कोथरूडमध्ये ३८४ आसनक्षमता असलेले छोटेखानी नाट्यगृह आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे कायमस्वरूपी दालन अशी रचना केली जात असून, बाळासाहेब ठाकरे कलामंदिराचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये हे कलामंदिर रसिकांसाठी खुले होणार आहे. 

Web Title: Pune's cultural heritage focuses on two theaters; New Vastu at Kothrud, Yerwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.