पुण्यातील पहिले ‘पेट पार्क’ बाणेरमध्ये; खेळ, शॉपिंग, दवाखाना, पेट टॉयलेटची खास सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 11:49 AM2018-01-16T11:49:16+5:302018-01-16T11:52:48+5:30
स्मार्ट सिटीअतंर्गत पुण्यातील पहिले ‘पेट पार्क’ बाणेर येथे सुरू करण्यात येत आहे. पाळीव श्वानांसाठी फिरण्याची हक्काची जागा ही गरज झाली आणि त्यातून शहरामध्ये ‘पेट पार्क’ची संकल्पना अस्तित्वात येत आहे.
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : पुणेकरांची लाईफ स्टाईल बदलत असून, महागड्या श्वानांच्या प्रजाती पाळणारे हौशे पुण्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर श्वानांची भीती, त्यांच्या भुंकण्याच्या आवाजाचा त्रास, खेळण्यासाठी लागणारी पुरेशी जागा अशा अनेक गोष्टींमुळे सार्वजिनक उद्यानांमध्ये श्वानांना फिरायला नेण्यासाठी बंदी असते. अगदी भल्या पहाटेपासून रस्त्यावरील भरधाव रहदारीतून फिरण्यासाठी श्वानांना साखळी लावणेही अपरिहार्य होते. श्वानांना मोकळेपणाने खेळता यावे, पुरेसा व्यायाम व्हावा यासाठी पाळीव श्वानांना खेळण्यासाठी सर्वत्र उद्याने करण्याची मागणी वाढत आहे. यामुळेच स्मार्ट सिटीअतंर्गत पुण्यातील पहिले ‘पेट पार्क’ बाणेर येथे सुरू करण्यात येत आहे.
पुण्यातील हजारो कुटुंबांमध्ये परदेशी श्वान प्रजाती घरातील भाग होत आहेत. घरातल्याच सदस्याप्रमाणे श्वानांचाही विचार होऊ लागला. पोटच्या मुलाप्रमाणे या पाळीव कुत्र्यांसाठी रोजचे फिरणे, व्यायाम, खाणेपिणे करण्याचे खास वेळापत्रकच तयार केले जाते. परंतु मनुष्याप्रमाणेच उंच टॉवर्स, मोठे व प्रचंड रहदारीचे रस्ते, चकचकीत मॉल संस्कृतीमुळे या पाळीव प्राण्यांना देखील मोकळा श्वास घ्यायला जागा शिल्लक नाही. तीन-चार खोल्यांच्या सदनिकेत हे पाळीव श्वानदेखील अडकून पडले आहेत. याचा श्वानांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळेच पाळीव श्वानांसाठी फिरण्याची हक्काची जागा ही गरज झाली आणि त्यातून शहरामध्ये ‘पेट पार्क’ची संकल्पना अस्तित्वात येत आहे.
शहराच्या विविध भागांत महापालिकेच्या मालकीच्या रिकाम्या जागा, भूखंड वापराविना पडून आहेत. तर अनेक ठिकाणी अतिक्रमणेदेखील झाली आहेत. या रिकाम्या जागांचा उपयोग करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने प्लेस मेकिंग ही संकल्पना समोर आणली आहे. यात औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात स्थानिक क्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत सामुदायिक शेती, सायन्स पार्क, बुकजानिया आणि आता किड्स आणि पेट पार्क उभारण्यात येणार आहे.
पोटच्या मुलांप्रमाणे या पाळीव कुत्र्यांसाठी रोजचे फिरणे, व्यायाम, खाणेपिणे इत्यादींचे खास वेळापत्रकच तयार केले जाते.
पुण्यातील पहिले सार्वजनिक ‘पेट पार्क’ बाणेर येथे तयार करण्यात येणार आहे.
या प्रशस्त अशा पेट पार्कमध्ये पाळीव कुत्र्यांसाठी मोठा जॉगिंग ट्रॅक, खेळण्यासाठी विविध प्रकारची उपकरणे, पोहण्याचा तलाव, पेट क्लिनिक, पेट शॉपिंग सेंटर, पेट टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
याशिवाय पेटसोबत येणाऱ्या मालकांसाठीदेखील विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.