पुणे : ज्येष्ठ उद्योजक आणि समाजसेवक नितीन देसाई (nitin desai) यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार (punyabhushan award 2022) जाहीर झाला आहे. पुणे गुजराती केळवणी समाज, एच. व्ही. देसाई महाविद्यालय, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, अंधशाळा या माध्यमातून देसाई सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सोन्याच्या फळाने पुण्याची भूमी नांगरणाऱ्या बालशिवाजींची प्रतिकृती आणि पुण्याच्या ग्रामदैवतांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्ह आणि १ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाचा हा पुरस्कार दि. १ जुलैनंतर होणाऱ्या खास समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे गेली ३२ वर्षे ‘पुण्यभूषण पुरस्कार’ दिला जात आहे. विविध क्षेत्रातील आपल्या अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव जगभर पोचविणाऱ्या पुणेकरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने उद्योग क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल नितीन देसाई यांची यंदाच्या पुण्यभूषण पुरस्कारासाठी निवड केली असल्याची माहिती पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी दिली आहे.
यावेळी सीमेवर कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या वीर जवानांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये हवालदार मोहम्मद फैय्याज आलम, लान्स नाईक जयेंद्र भेंडेरकर, लान्स नाईक एम. जे. चाको, गनर समशेरसिंग आणि शिपाई वलसालन नादर यांचा समावेश आहे. मूळचे बिडी निर्माते असलेले नितीन देसाई हे देसाई ब्रदर्सचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. हा उद्योग केमिकल, आरोग्य, बांधकाम आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात कार्यरत आहे. उद्योगाची उलाढाल ८०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.