पुणे : पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत हवाईदलाने उपस्थित केलेल्या तांत्रिक आक्षेपांबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने सादर केलेल्या अहवालामध्ये अत्यंत त्रोटक माहिती असल्याचे ताशेरे हवाईदलाने दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत ओढले. याबाबत सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश हवाईदलाने कंपनीला या बैठकीमध्ये दिले.हवाईदलाने उपस्थित केलेल्या आक्षेपांबाबत कंपनीने सादर केलेल्या अहवालाबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीमध्ये हवाईदल, भारतीय विमानतळ प्राधिकरण, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या तांत्रिक विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेण्यात आली. पुरंदर येथे होऊ घातलेल्या विमानतळाचे आणि लोहगाव विमानतळाचे हवाई क्षेत्र सामाईक (कॉमन फ्लाईंग एरिया) होण्याची शक्यता असल्याचा प्रमुख आक्षेप हवाईदलाने उपस्थित केला होता. त्यानंतर पुरंदर विमानतळाची धावपट्टी आणि लोहगाव विमानतळाची धावपट्टी समांतर करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानंतर पुरंदर विमानतळाच्या धावपट्टीमध्ये कोनीय बदल (अँग्यूलर चेंज) करण्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मान्य केले. राज्याच्या कंपनीकडून याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला होता. हा अहवाल संरक्षण विभागाला पाठविण्यात आला होता.या अहवालावर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. या वेळी कंपनीच्या अधिकाºयांनी अहवालाविषयी माहिती दिली; मात्र, ही माहिती त्रोटक असल्याचे सांगत नियोजित पुरंदर विमानतळाबाबत हवाईदलाच्या शंकांचे निरसन करुन त्यांचे समाधान करण्यात यावे, असे मत संरक्षण विभागाने या बैठकीदरम्यान व्यक्त केले. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी ७ जुलै २०१७ रोजी घेतलेल्या बैठकीनंतर तीन महिन्यांनी ही बैठक झाली. हवाई दलाने पुणे शहर व परिसरात संरक्षण विभागाची महत्त्वाची केंद्रे असल्याने पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळामुळे भविष्यात एनडीएसह हवाईदलाच्या लोहगाव येथील उड्डाणांना अडथळा होईल असा आक्षेप नोंदवला होता.तसेच लोहगाव आणिएनडीएच्या धावपट्टीवरून नियमितपणे हवाईदलाच्या विमानांच्या होत असलेल्या सरावामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, असा आक्षेपही होता.>हवाईदलाने उपस्थित केलेल्या आक्षेपांवर आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्यांना सर्व प्रकारे स्पष्टीकरण देण्यात आले असून, अहवालाबाबत आणखी सविस्तर माहिती त्यांना हवी आहे. त्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. आम्ही तांत्रिक मुद्यांवर दोन आठवड्यांत सविस्तर माहिती देऊ.- सुरेश केकाणे,आयुक्त, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी
पुरंदर विमानतळ : कंपनीचा अहवाल, तांत्रिक आक्षेपांची त्रोटक माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:58 AM