पुरंदरे ‘जलमित्र’ तर पाटील ‘बीजमित्र’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:17 AM2021-02-23T04:17:29+5:302021-02-23T04:17:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पाणी पंचायतीचे प्रवर्तक विलासराव साळुंखे यांच्या स्मृतीनिमित्त दिले जाणारा ‘जलमित्र’ पुरस्कार ज्येष्ठ जलनियोजनतज्ज्ञ प्रदीप ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पाणी पंचायतीचे प्रवर्तक विलासराव साळुंखे यांच्या स्मृतीनिमित्त दिले जाणारा ‘जलमित्र’ पुरस्कार ज्येष्ठ जलनियोजनतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांना, तर ‘बीजमित्र’ पुरस्कार सेंद्रिय शेती आणि बीज संवर्धन कार्यकर्ते संजय पाटील यांना ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक सागर धारा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गौरवपर मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
ग्राम गौरव प्रतिष्ठानतर्फे शेतकरी प्रशिक्षण केंद्र, खळद (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे आयोजित ‘ग्रामीण विकास मंथन’ कार्यशाळेत पुरस्कार प्रदान सोहळा झाला. पुरंदरे यांनी पुरस्कार रकमेत स्वत:ची भर घालून देणगीदाखल ती पाणी पंचायतीच्या अध्यक्ष कल्पना साळुंखे यांच्याकडे सुपूर्द केली. पाणी पंचायतीच्या डॉ. सोनाली शिंदे, शेती प्रश्नाचे अभ्यासक पांडुरंग शितोळे, इकॉलॉजिकल सोसायटीचे विश्वस्त प्रा. गुरुदास नूलकर, वनराईचे सचिव अमित वाडेकर, ज्येष्ठ पर्यावरणवादी दिलीप कुलकर्णी, जगदीश चौधरी, मोहन पाटील, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
पुरंदरे यांनी विलासरावांच्या ‘समन्यायी पाणी वाटप’ धोरणाच्या आवश्यकतेविषयी प्रतिपादन केले. संजय पाटील यांनी पुरस्कारामुळे काम करण्यास उमेद मिळाल्याचे सांगितले. ग्रामीण विकास मंथन कार्यशाळेचे आयोजन पंचायत, पर्यावरण समृद्धी मंच आणि साऊथ अशियन पीपल्स ऍक्शन फॉर क्लायमेट क्रायसेस या संस्थांनी केले होते.