दूध खरेदीसाठी ३ नव्हे ५ रुपये प्रतिलिटर अनुदान द्या : राज्य दूध व्यावसायिक संघटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 12:30 PM2019-03-12T12:30:36+5:302019-03-12T12:32:07+5:30
गेल्या सहा महिन्यांपासून राज्य सरकारकडून दूध खरेदीसाठी दूध उत्पादकांना अनुदान देण्याची योजना राबविली जात आहे
पुणे: राज्य शासनाने दूध अनुदानाची रक्कम कमी करून फेब्रुवारी महिन्यात प्रति लिटर केवळ ३ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दूध व्यापसायिकांना प्रति लिटर २ रुपये तोडा सहन करावा लागणार आहे. यामुळे शासनाने ३ रुपये ऐवजी ५ रुपये प्रति लिटर अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य दूध व्यावसायिक संघटनेच्या वतीने रविवारी पुण्यात झालेल्या बैठकीत केली.
राज्य शासनाने दूध उत्पादनक शेतक-यांना हमी भावानुसार किमान २५ रुपये लिटर दूध देणे आवश्यक आहे. परंतु दूधाचे दर कमी झाल्याने शेतक-याकडून २५ रुपये दराने दूध खरेदी करण्यास दूध व्यावसायिकांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून राज्य सरकारकडून दूध खरेदीसाठी दूध उत्पादकांना अनुदान देण्याची योजना राबविली जात आहे. शासनाच्या या अनुदान योजनेत राज्यातील बहुतेक सर्व दूध डेअ-या सहभागी झाल्या आहेत. शेतक-यांच्या दूधाला २५ रुपये दर देताना दूध व्यावसायिकाला प्रतिलिटर २० रुपये द्यावे लागत आहे. यामुळे शासनाकडून ५ रुपये अनुदान देण्यात येत होते. परंतु आता फेब्रुवारी महिन्यांत शासनाने ५ रुपये ऐवजी ३ रुपयेच अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व दूध व्यावसायिक संघटनेची रविवारी पुण्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीत शासनाने नेहमी प्रमाणे ५ रुपये अनुदान देण्याची मगाणी करण्यात आली असल्याची माहिती राज्य दूध व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष दशरथ माने यांनी सांगितले.