- तानाजी करचे
पुणे : गरीब, वंचित, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा देण्याच्या नावाखाली समाज कल्याण विभागातील प्रशासनाने काेटींचा मलिदा लाटल्याचे समाेर आले आहे. याबाबत ‘लाेकमत’ने केलेल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये बेड, गादी, उशी, कपबर्ड, टेबल, खुर्ची आदी साहित्याच्या ५९ कोटींच्या खरेदीत तब्बल ५० कोटींचा भ्रष्टाचार केल्याची धक्कादायक बाब समाेर आली आहे.
वसतिगृह व निवासी शाळेत राहणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा वाढवण्याच्या योजनेंतर्गत राज्याचे तत्कालीन समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी २०२२ मध्ये खरेदी समितीद्वारे ५९.४३ कोटी रुपयांची खरेदी केली. यात खरेदी केलेल्या वस्तूंच्या प्रत्यक्ष बाजारातील किमती आणि जेम पोर्टलवर उपलब्ध किमतींची तुलना करता समाज कल्याण विभागाने खरेदी केलेला दर सहा ते सात पटीहून अधिक दिसून येत आहे.
या खरेदीत जेम पोर्टलचा वापर करून शासनाची करोडो रुपयांची फसवणूक केली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयी-सुविधांत वाढ करण्याच्या नावाखाली समाज कल्याणच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी स्वतःच्या व पुरवठादाराच्या आर्थिक सुविधेत वाढ केल्याचे दिसत आहे.
काही पुरवठादारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे, उद्योग मंत्री, आयुक्त प्रशांत नारनवरे यांना पत्र लिहून खरेदी प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते, तरीही याकडे दुर्लक्ष करून रेटून चुकीची खरेदी प्रक्रिया पूर्ण करून शासनाची करोडो रुपयांची फसवणूक केली.
उशी केवळ ७५ची, घेतली ३४९ रुपयांना
समाज कल्याण विभागाने खरेदी केलेली उशी बाजारात ७५ रुपयांना उपलब्ध होते, तीच ३४९ रुपयांना खरेदी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे दीड किलो वजनाच्या उशी पुरवठा करायचा असताना प्रत्यक्षात ८०० ग्रॅम वजनाचीच उशी उपलब्ध झाली आहे.
उशीचे कव्हर ७१ रुपयांचे, घेतले १६९ रुपयांना
समाज कल्याण विभागाने ८०,५९२ उशींचे कव्हर खरेदी केले आहे. प्रत्यक्ष बाजारात ब्रँडेड उशी कव्हर ७१ रुपयांत उपलब्ध असतानाही एकदम खालच्या दर्जाचे आणि तब्बल १६९ रुपयांना खरेदी करून शासनाची काही काेटी रुपयांची लूट केल्याचे समोर आले आहे.
गादी खरेदीत २८ कोटींचा भ्रष्टाचार
पुरवठा केलेल्या गाद्यांपेक्षा उत्तम दर्जाच्या गाद्या जेम पोर्टलवर ४०० रुपयांना उपलब्ध आहेत. तरीही राज्याच्या आयुक्तांनी एकदम हलक्या दर्जाची गादी ७ हजार ६७० रुपयांना खरेदी केली आहे. अशा ३८,८५३ गाद्या खरेदी केल्या असून, यात २८ कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे.
- २५००चा टेबल घेतले २०,००० रुपयांना
जेम पोर्टलवर जो टेबल अडीच हजार रुपयांना उपलब्ध आहे, त्यापेक्षा कमी दर्जाचा टेबल आयुक्तांनी १९ हजार ९३० रुपयांना खरेदी केला आहे.
दीड हजाराची खुर्ची साडेसात हजारांना
समाज कल्याण विभागाने खरेदी केलेल्या खुर्चीपेक्षा दर्जेदार खुर्ची दीड हजार रुपयांमध्ये जेम पोर्टल ऑनलाइन मार्केटमध्ये उपलब्ध असताना देखील प्रती नग ७ हजार ५६४ रुपयांना खुर्च्यांची खरेदी केली आहे.
साडेतीन हजारांचा मेटल बेडसाठी दिले साडेसतरा हजार
जो मेटल बेड जेम पोर्टल वरती ३ हजार ५२५ रुपयांना उपलब्ध आहे, तोच मेटल बेड १७ हजार ४१२ रुपयांना खरेदी करून ९ करोड रुपयांच्या वरती शासनाची फसवणूक केली आहे.
२५ हजारांच्या लॅब टेबलसाठी दिले सव्वालाख रुपये
जेम पोर्टलवर प्रत्यक्षात पुरवठा केलेल्या टेबल पेक्षा उत्तम दर्जाचा टेबल पंचवीस हजार रुपयांना मिळत असतानाही त्यापेक्षा अर्ध्या दर्जाच्या टेबलसाठी १ लाख १५ हजार ५१० रुपये देऊन कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.
शासनाने परवानगी दिल्यानंतरच खरेदी प्रक्रिया पूर्ण केली आहे. यामध्ये आमच्या सर्व अधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त करून घेऊन खरेदी केली आहे . त्यामुळे यात काय गैरप्रकार झाल्याचे मला वाटत नाही.
प्रशांत नारनवरे ( तत्कालीन समाज कल्याण आयुक्त , महाराष्ट्र राज्य )